मुंबई : ओशिवरा परिसरातील एका सोसायटीवर गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र या गोळीबारात कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत दाहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले. या गोळ्या नालंदा नावाच्या 11 मजली इमारतीतील दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागल्या. यातील एक गोळी खिडकीच्या लाकडी चौकटीत, तर दुसरी भिंतीत घुसली.
गोळीबाराची माहिती समजताच स्थानिक आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी आले होते. या गोळीबारानंतर या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह इतर तांत्रिक अंगाने शोध सुरू केला आहे. हा गोळीबार वैयक्तिक वादातून झाला की एखाद्या टोळीच्या सदस्याने केला याबाबतची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे.