मुंबई : विविध जोडण्या, चाचण्या आदी प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पाच्या मुख्य भुयारीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टीबीएम जमिनीखाली उतरवण्यात आले होते.
मुंबईच्या किनारी भूभागातील मिश्र व खडतर भूस्तरासाठी अचूक व सुरक्षित खोदकाम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वांत मोठ्या स्लरी-शील्ड टनल बोरिंग मशीनने (टीबीएम) भुयारीकरण केले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन बोगदे उभारले जाणार असून त्यांची एकूण लांबी जवळपास 7 किमी आहे. त्यापैकी सध्या सुरू असलेला पहिला बोगदा हा 3.45 किमी लांबीचा असून त्याची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून कमाल 52 मीटर असेल. टीबीएम जमिनीखाली उतरवल्यानंतर प्रकल्पाने अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण केले आहेत. त्यामध्ये टीबीएमच्या बॅकअप प्रणालीचे घटक खाली उतरवून त्यांचे टीबीएम शील्डशी संयोजन, तसेच प्रारंभिक भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करणे यांचा समावेश आहे.
3 डिसेंबर 2025 ः
टीबीएम लॉन्चिंग.
8 जानेवारी 2026 ः
प्रारंभिक भुयारीकरणाला सुरुवात करीत तात्पुरत्या रिंगची उभारणी.
26 जानेवारी 2026 ः
कायमस्वरूपी रिंग उभारणीस प्रारंभ.
31 जानेवारी 2026 ः
प्रारंभिक भुयारीकरण पूर्ण.
26 फेब्रुवारी 2026 ः
मुख्य भुयारीकरण
टप्प्याकडे संक्रमण पूर्ण.
28 फेब्रुवारी 2026 ः
मुख्य भुयारीकरणास प्रारंभ.