Onion News  Pudhari
मुंबई

Mumbai Onion Price Hike: कांदा पुन्हा महागला! मुंबईत किरकोळ दर ₹६० किलोवर; दिवाळीत नवीन आवक होण्याची शक्यता

जुना लाल कांद्याचा साठा कमी झाल्याने मुंबईतील बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचा दर प्रतिकिलो ₹६० वर पोहोचला आहे. दिवाळीच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

गणेश शिंदे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडाला आहे. स्वयंपाक घरातील वस्तूंचे दर तर कडाडले आहेत. त्यातच आता साखरेच्या दरवाढीनंतर कांद्यानेही सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

जुना लाल कांद्याचा साठा कमी झाल्याने मुंबईतील बाजारात कांद्याची आवक घटली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातील कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांवर गेले आहेत.

दरम्यान, दिवाळीत म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात नवीन कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. मात्र कांद्याचा दर्जा जसा असेल तसा दर त्यावेळी ठरेल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील दादर, भायखळा रेल्वेस्थानक जवळील बाजारात कांद्याचे घाऊक व्यापारी व विक्रेते आहेत. या ठिकाणी लासलगांव, मंचर, फलटण, लोणंद जिल्ह्यांसह नवी मुंबई बाजार समितीतूनही कांद्याची आवक होत असते. सध्या बाजार समितीत गोळी कांद्याचे ५० किलोचे पोते १५ हजार रुपयांना मिळत आहे.

बाजार समितीतून एक लाख रुपयांचा कांदा खरेदी करायचा झाल्यास दलालाचे कमिशन ६५०० रुपये, बाजार समिती पावती १५०० रुपये आणि वाहतूक खर्च १ हजार असे ९ हजार रुपये द्यावे लागतात.

त्याचा परिणामही विक्रीवर होत आहे. कांद्याच्या दरात वाढ, महागाईमुळे कामगारांना महिन्याला २२ ते २३ हजार रुपये पगार द्यावा लागतो. त्यातच सध्या कांद्याच्या दरात वाढ झाल्याने कांद्याची खरेदी कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

घाऊक बाजारातील कांद्याचे दर

  • टणक कांदा ३५ रु.

  • साधा कांदा ४० ते ४५ रु.

  • गोळा कांदा ५० ते ५५ रु.

  • पांढरा कांदा ६० रु.

बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. व्यापाऱ्यांकडील जुना कांदा संपण्यास दीड महिना लागेल. त्यामुळे दिवाळीच्या काळात नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यावेळी कांद्याच्या दर्जावर त्याचा बाजारात दर ठरेल. दर वाढेल की कमी होईल, हे आताच सांगता येणार नाही.
- कपूरचंद गुप्ता, कांदा विक्रेते, दादर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT