मुंबई : शहरातील वरळी येथील लोटस जेट्टीजवळ अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय सरवणकर (वय ५८), संतोष विश्वेश्वर (वय ५१) आणि कुणाल कोकाटे (वय ४५) हे तिघे जण वरळी येथील लोटस जेट्टीजवळच्या समुद्रात अस्थी विसर्जनाच्या विधीसाठी आले होते. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे तिघेही समुद्राच्या पाण्यात बुडू लागले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांनी तिघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एका व्यक्तीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा समुद्राकिनारी असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.