ठळक मुद्दे
यादी जाहीर करण्यापेक्षा तयारीला लागण्याचे फोन ; परस्पर बोलावून एबी फॉर्म देण्याच्या हालचाली
भाजप-शिवसेनेत चर्चेच्या फेऱ्या सुरूच
ठाकरे बंधूंचेही एकमत होईना
मुंबई : मुंबईसह महानगरपालिका नका राज्यभरातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एकीकडे इच्छुकांची गर्दी आणि दुसरीकडे विरोधी पक्षांकडून उमेदवार पळविण्याची भीती यामुळे सर्वच राजकीय पक्षांना बंडांची भीती वाटू लागली आहे. बहुतांश ठिकाणी पक्षांनी आपल्या उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता बाळगली असली तरी पक्षांना सोमवारी आपली यादी जाहीर करावीच लागणार आहे. त्यामुळे बंडोबांना थंडोबा करायचे कसे, याचा दबाव पक्षांवर वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी वगैरे जाहीर करून बंडाळीला निमंत्रणे देण्यापेक्षा थेट फोन करून 'निरोप' देण्याचा पर्याय राजकीय पक्षांनी निवडला आहे. नाव नक्की झालेल्या उमेदवारांना फोन करून अर्ज भरण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहे. पण त्यातून आजचे संकट उद्यावर जाईल, यापेक्षा फारसे काही होणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने वेळेत अर्ज सादर करण्याचे आव्हान इच्छुकांसमोर असणार आहे. युतीच्या चर्चा लांबल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. उमेदवारी दिल्याचे किंवा नाकारल्याचे अधिकृतपणे नक्की होत नाही, तोपर्यंत इच्छुकांच्या हाती वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही.
राज्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर असा आठ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आता अवघे दोन दिवस शिल्लक असले तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणाच करण्यात आलेली नाही. युती आणि आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालू ठेवण्यामागेही बंडोबांना थंड करण्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांतील युतीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
मुंबईतील २२७ जागांपैकी २०७ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून केवळ २० जागांवर निर्णय बाकी आहे. २०७ पैकी १२८ जागा भाजपकडे तर ७९ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. उर्वरित २० जागांसाठी रविवारी रात्री चर्चेला सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तिढा असलेल्या जागांवर अंतिम निर्णय करतील.
महायुतीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहमती झालेल्या जागांवरील संभाव्य उमेदवारांना निरोप पाठविले जात आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बंडाळीचा फटका बसू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. दुसरीकडे अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची तयारीही चालविल्याचे समजते.
मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने युतीची घोषणा केली असली तरी जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र जाहीर करण्याचे टाळले आहे. उमेदवार पळविणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याने जागावाटपाचा आकडा सांगणार नाही, असे खुद्द राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करतानाच जाहीर केले होते. त्यानुसार दोन्ही ठाकरे बंधूंनी आपापल्या उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकर, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे अशा निवडक नेत्यांमार्फतच यासंदर्भातील चर्चा केल्या जात आहेत. दादर, शिवडी, भांडुप, चांदिवलीसह काही भागात दोन्ही पक्षांकडून आग्रह धरला जात असला तरी जाहीर वाच्यता टाळण्याचे धोरण आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली. संघर्षाच्या या काळात एकमेकांत लढून एकमेकांचे रक्त सांडून विरोधकांसाठी मैदान मोकळे करायचे का, असा रोकडा सवाल केला. मनसेसोबत युतीचा निर्णय केला आहे. त्यामुळे एकी कायम ठेवत बंडखोरी टाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. उद्धव ठाकरेंनीही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यापेक्षा थेट एबी फॉर्म वितरित करण्यास सुरुवात केली आहे; तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलावला आहे. रंगशारदा सभागृहातील या मेळाव्यात राज ठाकरे यांच्याकडून बंडखोरी टाळण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे समजते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात कप्तान मलिक, धनंजय पिसाळ आदी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय पिसाळ यांनी रविवारीच शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला होता.
३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
मुंबईत काँग्रेस, वंचितची आघाडी मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडीची घोषणा केली आहे. वंचित ६२ जागा लढविणार आहे; तर उर्वरित जागा काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांकडे जातील.