मुंबई : राज्यातील अन्य महानगरपालिकांप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जाती जमातीच्या मतदारसंघांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे भाजपाने केली आहे.
भाजपच्या उत्तर मध्य मुंबईचे उपाध्यक्ष श्रीकांत भिसे यांनी याबाबत आयोगाला पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिकेत अनुसूचित जाती-जमातीसाठी १३ टक्के आरक्षित जागा आहेत. पुण्यात एकूण जागा १६५ असताना अनुसूचित जाती, जमातींसाठी १९ जागा दिल्या आहेत. नाशिकमध्ये एकूण जागा १२२ आहेत, त्यामध्ये १८ जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ११३ जागा आहेत. त्यात अनुसूचित जाती, जमातींसाठी एकूण २२ जागा राखीव आहेत, नागपुर महानगरपालिकेत एकूण १५१ जागा असून, त्यात अनुसूचित जाती-जमातीसाठी २४ जागा राखीव आहेत.
मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ जागा उपलब्ध असताना अनुसूचित जाती व जमातींसाठी फक्त १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील मतदारसंघात उमेदवारांचा कोटा कमी का, अशी विचारणा भिसे यांनी आयोगाला केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांची संख्या १५ वरून २५ करण्याची मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३-८ नुसार व मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ५ अ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ५अ व्या तरतुदीनुसार महानगरपालिकांमधील जागांचे आरक्षण निश्चित केले असल्याचे ही सदर पत्राला उत्तर देताना राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी स्पष्ट केले आहे.