नवी मुंबई : एपीएमसीतील कादां-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगार ओझ्याखाली पिचला गेला आहे. 50 किलोपेक्षा जास्त वजन नसावे असे शासनाचे आदेश असतानाही 60 ते 70 किलो वजनाच्या गोण्या त्यांना उचलाव्या लागत आहेत. त्यामुळे आता असह्य झाल्याने त्यांनी 1 मार्चपासून काम बंदचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेकडून याबाबतचे पत्र कांदा-बटाटा व्यापारी, अडत संघटनेला दिले आहे. यासह कामगारांच्या मूळ मजुरीच्या दरामध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी कोणत्याही मालाची वजन मर्यादा 50 किलोपर्यंत ठेवणे बंधनकारक केले असून तसे आदेश काढले आहेत. मात्र एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही.
याबाबत व्यापाऱ्यांना अनेकवेळा सांगण्यात आले आहे. मात्र आजही 60 ते 70 किलोपर्यंत गोणी भरल्या जात आहेत. त्यामुळे काम बंदचा इशारा देण्यात आल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
गुडघेदुखी, मणक्याचा त्रास वाढला
अधिकचे वजन उचलल्यामुळे माथाडी कामगारांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. कांदा बटाटा मार्केटमधील कामागारांना गुडघ्याचा, मणक्याचा व इतर शारीरिक त्रास वाढला आहे. त्यांना 60 ते 70 किलोच्या गोण्या उरापोटी उचलाव्या लागत आहेत. आता हा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे.
मजुरीत वाढ हवी!
सन 2000 मध्ये दाऊद कमिशन घटीत करून मजुरीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र आजपर्यंत मजुरीत वाढ केलेली नाही. महागाई भत्ता वाढ करून कामगारांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे महागाईच्या तुलनेत कामगारांचे पगार अत्यंत कमी आहेत. यात त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह अशक्य होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मूळ मजुरी दरामध्ये वाढ करण्यात यावी अशीही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.