मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रसुतिगृहातील डॉक्टरांसह आता चतुर्थ श्रेणी कामगारही टप्प्याटप्प्याने कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात चुनाभट्टी येथील मीनाताई ठाकरे व गोरेगाव येथील टोपीवाला प्रसुतिगृहामध्ये आयांसह अन्य कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागासह सुरक्षा विभाग, हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे. यात सफाई कामगारांसह सुरक्षारक्षक डॉक्टर, नर्सेस आदींचा समावेश आहे. आता प्रसुतीगृहांचीही टप्प्याटप्प्याने खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पहिल्या टप्प्यात हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कामगार यात आया, वॉर्डबॉय, सफाई कामगार, हमाल व अन्य कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बचत गट वगळून सेवाभावी व बेरोजगार संस्थांकडून या कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात चुनाभट्टी येथील मीनाताई ठाकरे व गोरेगाव येथील टोपीवाला प्रसुतीगृहामध्ये आयांसह अन्य कामगारांची १ वर्ष ते ६ महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या कालावधीला मुदत देण्याची तरतूदही ठेवण्यात आली आहे.
चुनाभट्टी प्रसूतिगृहात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता व जेवणही देण्यात येणार आहे. यात सकाळच्या वेळेत उपमा कांदा-पोहे, अंडे, दुपारी व रात्रीच्या जेवणात दोन पोळी भात, वरण, भाजी, दही व अन्य पदार्थ देण्यात येणार आहेत. याच पद्धतीने अन्य प्रस्तुतिगृहांमध्ये पौष्टिक नाश्ता व जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.