मुंबई: महानगरपालिकेत विविध पदावर नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी अमिता जगदीश राठोड या महिलेविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमिताने आतापर्यंत सोळाजणांची सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील तक्रारदार महिला चेंबूर येथे राहते. तीन वर्षांपूर्वी ती मनपाच्या एफ/साऊथ विभागात गेली होती. तिथेच तिची अमिताशी ओळख झाली होती.
ती तिथे 50 तरुणींना घेऊन मेडीकलसाठी आली होती. चौकशीदरम्यान अमिताने ती कस्तुरबा रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तिची मनपाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून अनेकांना मनपामध्ये नोकरी मिळवून दिली आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेने तिच्या मुलासह तिच्या परिचित काही बेरोजगार तरुणांना देण्याची विनंती केली होती. यावेळी अमिताने प्रत्येक उमेदवारामागे सत्तर हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
तिला चौदाजणांकडून प्रत्येकी सत्तर तर इतर दोघांकडून प्रत्येकी दहा हजार असे दहा लाख रुपये मिळालेे. 9 जानेवारी ते 27 जून 2024 या कालावधीत तिने अमिताला पाच लाख वीस हजार ऑनलाईन तर चार लाख ऐंशी हजार कॅश स्वरुपात दिले .
मात्र दिलेल्या मुदतीत तिने कोणालाही नोकरी दिली नाही. विचारणा केल्यानंतर तिने तिघांना मनपामध्ये नोकरी लागल्याचे बोगस नियुक्तीपत्र दिले. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु करताच अमिताने त्यांना दहा लाखांचे दोन धनादेश दिले, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले. तोपर्यंत अमिता राठोड ही पळून गेली.
शेवटी हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारा भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत अमिताविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध सोळा उमेदवारांची सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तिने असे किती जणांना गंडवले याचाही शोध आता घेतला जात आहे.