Babies Birth Record Pudhari
मुंबई

Babies Birth Record: मुंबई पालिका रुग्णालयांत ७ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात; २०२४-२५ मध्ये २२ बाळांची नोंद

मुंबई महापालिका रुग्णालयांत २०१९ ते २०२५ दरम्यान ६८ अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली. २०२४-२५ मध्ये २२ नोंदी; वॉर्डनिहाय माहितीचा अभाव.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये गेल्या काही वर्षांत अंतर्लिंगी (इंटरसेक्स) नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०१९ ते २०२५ या सात वर्षांच्या कालावधीत एकूण ६८ अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांतच २२ जन्मांची नोंद झाली आहे.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी महापालिकेच्या एफ/दक्षिण विभागाकडे २०२१ ते २०२६ या कालावधीतील अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची वर्षनिहाय, २४ वॉर्डनिहाय तसेच धर्मनिहाय माहिती मागितली होती. त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध नोंदीनुसार वर्षनिहाय आकडेवारी दिली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये सर्वाधिक २१ जन्मांची नोंद झाली होती. २०२० मध्ये १९, तर २०२१ मध्ये सहा जन्म नोंदविण्यात आले. त्यानंतर २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांत एकही नोंद नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, २०२४ मध्ये पुन्हा १५ आणि २०२५ मध्ये सात अशा एकूण २२ अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली. विशेष म्हणजे, अर्जामध्ये २४ वॉर्डनिहाय आणि धर्मनिहाय माहिती मागण्यात आली असतानाही महापालिकेने केवळ वर्षनिहाय आकडे उपलब्ध करून दिले आहेत.

त्यामुळे या जन्मांची नोंद कोणत्या रुग्णालयांमध्ये झाली, २४ वॉर्डांमध्ये त्याचे प्रमाण किती आहे आणि महापालिका या प्रकारच्या जन्मांची नोंद नेमक्या कोणत्या निकषांनुसार करते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्वाधिक नोंद : २०१९ मध्ये २१ जन्म

२०२२-२३ : एकही जन्म नोंद नाही

२०२४-२५ : दोन वर्षांत २२ जन्मांची नोंद

एकूण : २०१९ ते २०२५ दरम्यान ६८ जन्म जन्मजात जैविक स्थिती

“गर्भाची वाढ होत असताना लैंगिक विकासाच्या प्रक्रियेत काही जैविक बदल किंवा कमतरता राहिल्यास बाळाच्या जननेंद्रियांची अथवा लैंगिक वैशिष्ट्यांची रचना नेहमीच्या पुरुष किंवा स्त्री वर्गीकरणापेक्षा वेगळी होऊ शकते. अशा स्थितीला इंटरसेक्स असे म्हटले जाते. मात्र, यामागे नेमके एकच कारण नसते. गुणसूत्रे, हार्मोन्स आणि गर्भातील लैंगिक विकासाची प्रक्रिया यांसारख्या विविध घटकांचा त्यात सहभाग असू शकतो. त्यामुळे इंटरसेक्स असणे ही कोणाचीही चूक नसून, ही जन्मजात जैविक स्थिती आहे.”
-डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जरी विभाग, जे. जे. रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT