मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीची सत्ता येणार असली तरी, महत्त्वाच्या ४ वैधानिक समित्यांमधील सुधार समितीत सत्ताधारी व विरोधकांचे सदस्य समसमान राहणार असल्यामुळे अध्यक्ष पद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी एकूण नगरसेवकांच्या संख्येवर समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात येते. सध्याच्या नगरसेवक संख्येनुसार भाजपा शिवसेना महायुतीचे १३ सदस्य सुधार समितीवर जातात. तर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, एमआयएमचे १३ नगरसेवक सदस्य होणार आहेत.
त्यामुळे सुधार समिती अध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधकांना समसमान मते पडणार आहेत. अशावेळी चिठी उडवून अध्यक्षपदाची नियुक्ती करावी लागणार आहे. यात विरोधकांच्या बाजूने शिट्टी पडल्यात महापालिकेत सत्ता असूनही सुधार समितीवर विरोधी पक्षाचा नगरसेवक अध्यक्ष म्हणून विराजमान होऊ शकतो. हा धोका महायुतीला टाळावा लागणार आहे.
सुधार समितीतील सदस्य समसमान असल्यामुळे होणारा गोड लक्षात घेऊन भाजप शिवसेनेला एकत्र येऊन गट स्थापन करावा लागणार आहे. एकत्र गट स्थापन केल्यास सुधार समितीत सत्ताधारी महायुतीची सदस्य संख्या १४ होऊ शकते. पण एकत्रित गट स्थापन केल्यास शिवसेनेला गटनेते पद गमवावे लागेल. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकत्रित गट तयार करण्यासाठी मॅरेथॉन चर्चा सुरू आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीने एकत्रित गट स्थापन करावा, अशी विनंती केल्याचे समजते. त्यामुळे आता दोन्ही पक्ष काय निर्णय घेणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
एकत्रित गट स्थापन केल्यास महायुतीला फायदा
भाजपा शिवसेना महायुतीने एकत्रित गट स्थापन केल्यास सर्वच समित्यांमधील कामकाज करणे सोपे जाईल. पालिकेच्या स्थायी समितीमध्येही समसमान सदस्य संख्या आहे. मात्र शिक्षण समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्यामुळे महायुतीचे संख्याबळ एकने जास्त आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचा एक सदस्य जरी गैरहजर राहिला तरी, प्रस्ताव मंजूर करताना संख्या बळाची मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे एकत्रित येणे फायदेशीर होणार आहे. बेस्ट मध्ये ही समसमान सदस्य संख्या आहेत परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र घेतल्यास फायदा
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. यात तीन नगरसेवकांना घेऊन भाजपाने एकत्रित गट स्थापन केल्यास सुधार समिती सदस्यांची संख्या एकने वाढू शकते. पण महापालिका निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निवडणूक न लढवणारी भाजपा नवाब मलिक यांच्या नगरसेवकांना सोबत घेईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे