BMC Pudhari
मुंबई

Mumbai News: पावसाळ्यानंतर नवीन महापालिका सभागृहाचे भूमिपूजन!

मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालयातील सध्याचे हेरिटेज सभागृह अपुरे पडत असल्यामुळे सत्ताधारी भाजपाने नवीन सभागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अखेर मुंबई महापालिकेचे भव्य दिव्य सभागृह महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर नवीन महापालिका सभागृहाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालयातील सध्याचे हेरिटेज सभागृह अपुरे पडत असल्यामुळे सत्ताधारी भाजपाने नवीन सभागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती.

महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानला लागून असलेल्या जिमखाना इमारतीच्या जागी सभागृह उभारण्यासाठी भाजपाने आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जिमखान्याच्या जागी टाऊन हॉल उभारण्यासाठी महापालिकेने स्थायी समितीत सादर केलेला प्रस्तावही फेटाळण्यात आला. त्यामुळे जिमखान्याच्या जागी भव्य दिव्य महापालिका सभागृह उभे राहणार आहे.

हे सभागृह कसे असेल याबाबतचा आराखडा पालिकेच्या वास्तुविशारदाने तयार केला असून तो लवकरच महापौर रितू तावडे यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वपक्षीय गटनेता व पालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सभागृहात ३५० पेक्षा जास्त नगरसेवक बसतील एवढी आसन व्यवस्था करण्यात येणार असून अधिकाऱ्यांसाठी ही बसायची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याशिवाय पत्रकारांसाठीही पुरेसी आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या सभागृहात अपुऱ्या जागेमुळे होणारा गोंधळ टळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT