mumbai municipal corporation Pudhari News Network
मुंबई

Mumbai Municipal Corporation House : महापालिकेच्या 426 घरांसाठी आले 2037 अर्ज !

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; 20 नोव्हेंबरला सोडत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेने काढलेल्या ४२६ घरांच्या लॉटरीसाठी १४ नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत २०३७ जणांनी अर्ज भरले आहेत. आता हे अर्जदार येत्या २० नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी पात्र असणार आहेत. अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे असून, अंधेरी, गोरेगाव आणि कांदिवली येथील घरांसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या घरांची किंमत ५९ लाख ते ७८ लाखांपर्यंत आहे. भायखळा येथील कोटींच्या घरांना मात्र अल्प प्रतिसाद मिळाला आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

विकास नियंत्रण नियमावली २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबवणाऱ्या विकासकाकडून पालिकेला प्रिमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. अशी ८०० घरे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्यातील ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. पालिकेकडून पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवर २० नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढली जाणार आहे.

गेल्या १६ ऑक्टोबरपासून घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली व १४ नोव्हेंबरला अंतिम मुदत होती. भांडुप, गोरेगाव, कांजूरमार्ग, भायखळा, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, दहिसर, गोरेगाव आदी ठिकाणी ही घरे आहेत. मोक्याच्या जागी असलेल्या या घरांची किंमत ५३ लाख ते १ कोटीपर्यंत ठेवण्यात आली आहेत. मुदत संपायला चार दिवस शिल्लक असताना फक्त ८५५ अर्जच आले. शुक्रवारी अंतिम मुदतीपर्यंत अनामत रकमेसह सर्व प्रक्रिया पूर्ण करून २०३७ अर्ज आले. २० नोव्हेंबरला या अर्जानुसार लॉटरी काढली जाणार आहे.

दहिसर, भायखळ्याला अल्प प्रतिसाद

अंधेरी पूर्व, गोरेगाव, कांदिवली येथील घरांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मरोळ-अंधेरी पूर्व येथे अल्प उत्पन्न गटासाठी १४ घरे आहेत. घराची किंमत ७८ लाख इतकी असून, या घरांसाठी ९३७अर्ज आले आहेत. तर गोरेगाव येथील अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५९ लाख किंमत असलेल्या १९ घरांना १८९ अर्ज, तर त्रिलोक पार्क-कांदिवलीतील अल्प उत्पन्न गटासाठी ८१ लाख किंमत असलेल्या ४ घरांसाठी ८३ अर्ज आले आहेत. भांडुपला २४० घरे असतानाही येथे फक्त १२९, तर कांजूर येथे २७ घरांसाठी फक्त ५५ अर्ज आले आहेत. दहिसर, भायखळा येथील घरांसाठीही फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कोणत्या ठिकाणी किती अर्ज :-

  • प्रेस्टिज भायखळा - ४२ घरांसाठी ११२ अर्ज

  • एलबीएस मार्ग भांडुप (प.) - २४० घरांसाठी १२९ अर्ज

  • मरोळ-अंधेरी (पू.) - १४ घरांसाठी ९३७ अर्ज

  • मजासगाव, जोगेश्वरी (पू.) - ४६ घरांसाठी ३९३ अर्ज

  • त्रिलोक पार्क, कांदिवली (प.) - ४ घरांसाठी ८३ अर्ज

  • स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू.) - १९ घरांसाठी १८९ अर्ज

  • कांदिवली (प.) - ३० घरांसाठी ११५ अर्ज

  • कांजूर-आदी अल्लर - २७ घरांसाठी ५५ अर्ज

  • सागर वैभव सोसायटी कांदिवली - ४ घरांसाठी २४ अर्ज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT