Mumbai Municipal Corporation pudhari photo
मुंबई

Mumbai Municipal Corporation Hall: मुंबई महापालिका सभागृह अपुरे! 237 नगरसेवक, बसायचे कुठे?

महापौर निवडणुकीपूर्वी जागेचा गंभीर प्रश्न; ब्रिटिशकालीन सभागृहावर ताण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

मुंबई महापालिकेची बुधवारी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होत आहे. मात्र निवडून आलेले 227 नगरसेवक, 15 ते 20 अधिकारी, 30 ते 35 पत्रकार, अन्य कर्मचारी यांना सभागृहात बसावायचे कुठे, हा मोठा प्रश्न पालिका प्रशासनापुढे आहे. 64 वरून नगरसेवकांची संख्या 237 झाली. मात्र मुख्यालयातील ब्रिटिशकालीन सभागृह तेच आहे.

ही जागेची अडचण दूर व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेचे सभागृह असावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र त्याची दखल न घेतल्याने हा पेच उभा राहिला आहे.

महानगरपालिका 1872 मध्ये अस्तित्वात आली. सुरुवातीला 64 सदस्य असलेल्या महापालिकेची पहिली सभा 4 सप्टेंबर 1873 रोजी भरली. त्यावेळी सध्याचे मुंबई महापालिका मुख्यालय नव्हते. 1893 मध्ये मुंबई महानगरपालिकेची सध्याची हेरिटेज इमारत अस्तित्वात आली. त्यानंतर नगरसेवकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली. 1963 मध्ये 140

एकसदस्य मतदारसंघाची स्थापना करण्यात आली आणि महापालिकेची मुदत चार वर्षांवरून पाच वर्षे अशी वाढवण्यात आली. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 1968 मध्ये 140 सदस्य असलेली पहिली निवडणूक घेण्यात आली. 1985 मध्ये नगरसेवकांची संख्या 170 इतकी झाली. नगरसेवकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने नवीन सभागृहाची निर्मिती करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. 1991 मध्ये मुंबई पालिकेच्या प्रभागांची संख्या 221, तर 2002 मध्ये 227 करण्यात आली. यात आता दहा स्वीकृत नगरसेवक मिळून 237 नगरसेवक असणार आहेत.त्यांना सभागृह अपुरे पडणार आहे.

पर्याय काय?

महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेवर महापालिका सभागृह उभारता आले असते. हे ठिकाण महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नगरसेवक व प्रशासनालाही सोयीचे झाले असते. पण आता जिमखाना इमारतीचा पुनर्विकास करून तेथे अत्याधुनिक टाऊन हॉल व कॅफे उभारण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयाला लागून राज्य उत्पादन शुल्काची जागा होती. येथेही सभागृह बांधण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र पालिकेने कोणतीही पावले न उचलल्यामुळे या जागेवर उत्पादन शुल्कची इमारत उभी राहिली आहे. पण पालिका प्रशासनाने ठरवले तर कॅफेचा निर्णय मागे घेत येथे भव्यदिव्य असे सभागृह बांधू शकते.

मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाला 1999 मध्ये लागलेल्या भीषण आगीत सभागृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सभागृह महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातील जुन्या विधानसभेच्या सभागृहामध्ये भरत होते. तब्बल वर्षभर येथे मुंबई महापालिकेच्या सभा झाल्या होत्या.

असे वाढले नगरसेवक

1872 64

1963 140

1982 170

1991 221

2002 227

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT