Mumbai Municipal Corporation OSD Promotion Issue
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कार्यालयाचे तत्कालीन सहआयुक्त आणि विद्यमान विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेले चंद्रशेखर चोरे यांना पालिका आयुक्तांनी बढती देण्यास नकार दिल्याने चोरे यांच्या पदाचा पदभार वित्त विभागातील उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला. परिणामी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी चंद्रशेखर यांच्याविरोधात पुकारलेले बंड यशस्वी ठरल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात रंगली आहे.
महापालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त असलेले चंद्रशेखर चोरे हे ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले होते. परंतु आयुक्त गगराणी यांनी त्यांना पुन्हा आयुक्त कार्यालयाचे ओएसडी म्हणून एक वर्षांचा कालावधी दिला होता. तो ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुर्ण झाला. यामुळे त्यांना पुन्हा बढती न दिल्याने उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे सदर विभागाचा कार्यभार तात्पुरता सोपविण्यात आला.
चंद्रशेखर चोरे यांना पुन्हा संधी न मिळावी, यासाठी नोव्हेंबर महिन्यात उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी बंड पुकारले होते. त्यांनी लेखी निवेदनाद्वारे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या तक्रार करून चोरे यांना मुदतवाढ न देण्याची मागणी केली होती. यामुळे आयुक्त यांनी सुध्दा चोरे यांना घरचा आहेर दिला.
महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, पृथ्वीराज चौहाण आणि मनीष वळंजू या तीन सहाय्यक आयुक्तांची उपायुक्त म्हणून प्रमोशन झाले आहे. परंतु आचारसंहितेमुळे यांची खात्यामध्ये नियुक्त रखडली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर महापालिका आयुक्त कार्यालयाला यापैकी एका उपायुक्तांची नियुक्ती होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.