Mumbai Rain
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईसह संपूर्ण पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबईला आधीच 'यलो अलर्ट' दिला होता, त्यानुसार मध्यरात्रीपासूनच पावसाची सुरुवात झाली. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळच्या सुमारास कामावर निघणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
मुंबईत आज सकाळी काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ८ या एका तासाच्या कालावधीत मुंबई शहरात सरासरी ०.९६ मिमी पाऊस झाला, तर पश्चिम उपनगरांमध्ये ९.८४ मिमी आणि पूर्व उपनगरांमध्ये १.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वर्सोवा येथे सर्वाधिक ६९ मिमी पावसाची नोंद झाली असून, विलेपार्ले येथे ५२ मिमी, अंधेरी पूर्व येथे ४९ मिमी आणि अंधेरी पश्चिम येथे ४६ मिमी पाऊस झाला. याशिवाय विलेपार्लेच्या दुसऱ्या निरीक्षण केंद्रात ३३ मिमी तर सांताक्रूझ येथे ३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पूर्व उपनगरांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला असून चेंबूर येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अचानक झालेल्या जोरदार सरींमुळे काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांनाही वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे भाकीत खरे असले तरी मान्सून सरासरी 98 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. कारण सध्या अल निनो सक्रिय झालेला नाही. तसेच भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थतेकडून सकारात्मकतेकडे जात आहे. त्यामुळे न घाबरता कमी पाण्याची पिके सुरुवातीच्या काळात घ्यावीत, असा सल्ला पुणे येथील ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
डॉ. साबळे हे गत 24 वर्षांपासून त्यांनी विकसित केलेल्या साबळे मॉडेलद्वारे मान्सूनचा अंदाज 1 जून रोजी देतात. सोमवारी त्यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीतील दीर्घ पर्जन्यमानाचा अंदाज दिला. यात राज्यातील 84 तालुके आणि 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. वार्याचा वेग, हवेचा दाब ही गृहीतके वापरून हा अंदाज देण्यात आला असून मॉडेलमध्ये अधिक-उणे 5 टक्के त्रुटी गृहीत धरण्यात आली आहे.