मुंबई : साथीच्या आजारांनी मुंबईकर आता चांगलेच तापले आहेत. मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मलेरियाचे 633, लेप्टोचे 35 रुग्ण, डेंग्यूचे 282 चिकनगुनियाचु 43 रुग्ण आढळून आले आहेत.
यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे हिवताप, डेंग्यू, अतिसार आणि चिकुनगुनियाच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही जूनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबईमध्ये विविध साथीच्या आजाराचे जूनमध्ये 884 रुग्ण सापडले होते. त्यातुलनेत जुलैच्या 15 दिवसांमध्ये 633 रुग्ण सापडले आहेत. तसेच जुलैमध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये लेप्टोचे 36 रुग्ण तर जुलैमध्ये आतापर्यंत 35 रुग्ण सापडले आहेत. चिकुनगुनियाचे जूनमध्ये 21 तर जुलैमध्ये 43 रुग्ण म्हणजेच दुपटीने वाढ झाली आहे.
जूनमध्ये अतिसाराचे 936 रुग्ण होते. जुलैमध्ये आतापर्यंत 318 रुग्ण आहेत. अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत काहीअंशी घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जुलैमध्ये डेंग्यूचे 282, करोनाचे 127 आणि हेपेटायटिसचे 40 रुग्ण सापडले आहेत.
नागरिकांनी ताप आल्यास महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वत: औषधे घेणे टाळावे.डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका