तोट्यात गेलेल्या मोनोरेलला उभारी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) विविध उपाययोजना नियोजित असल्या तरी त्या प्रत्यक्ष कधी साकार होणार याबाबत अनिश्चितता आहे. अशातच सध्या मोनोरेल मार्गावर धावणार्या गाड्यांमध्ये सतत होणारे तांत्रिक बिघाड, रद्द होणार्या फेर्या आणि मोनोरेल पकडण्यासाठी एकेक तास करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मोनोरेलचा पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर 2014 साली सुरू करण्यात आला. तसेच 2019 साली वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. सध्या मुंबईत 20 किमी मार्गावर मोनोरेलच्या 8 गाड्या धावतात. त्यावर एमएमआरडीएने 2 हजार 460 कोटी रुपये खर्च केले आहेत; मात्र अपेक्षित प्रवासीसंख्या गाठता न आल्याने हा प्रकल्प तोट्यात गेला.
जे प्रवासी मोनोरेलने प्रवास करण्यास इच्छुक आहेत त्यांची सध्या प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना मोनोरेलच्या दर दोन तासांचे वेळापत्रक दिले जाते. त्यातील बहुतांश फेर्या रद्द झालेल्या असतात. ज्या फेर्या सुरू असतात त्याही काही मिनिटे उशिराने येतात. सकाळी कामावर जाणार्या प्रवाशांना काही वेळा एक तास मोनोरेलची वाट पाहावी लागते. परिणामी, कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो व वेतनकपात केली जाते. एरव्ही रिकामी धावणारी मोनोरेल रद्द झालेल्या फेर्यांमुळे तुडुंब भरते. मोनोरेलच्या नियोजित फेर्या अधिक असतात व गाड्या कमी उपलब्ध असतात. त्यामुळे एखाद्या दिशेला जाणारी मोनोरेल मध्येच थांबवून दुसर्या दिशेला वळवली जात असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. मोनोरेलच्या स्थानकातून बाहेर आल्यास इतरत्र जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात बस, रेल्वे, टॅक्सी, इत्यादी सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुळातच प्रवासी मोनोरेल वापरण्यास इच्छुक नसतात आणि जे वापरतात त्यांच्या अडचणी ऐकायला स्थानकावर कुणीही उपलब्ध नसते.
मोनोरेल मार्गिकेवर स्वदेशी बनावटीच्या 10 नवीन गाड्या गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत येणार होत्या. त्यांच्या चाचण्याही सुरू झाल्या होत्या; मात्र अद्याप या गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झालेल्या नाहीत. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी ‘मेट्रो 2ब’ मार्गिका पुढील काही महिन्यांत सुरू करण्याचे नियोजन आहे. चेंबूर येथे मोनोरेलच्या जवळपासच मेट्रोचे स्थानक आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी मोनोरेलकडेही वळण्याची शक्यता आहे; मात्र या सर्व उपाययोजना प्रत्यक्षात येईपर्यंत प्रवाशांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमएमआरडीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
मोनोरेलकडून दिल्या जाणार्या वेळापत्रकातील बहुतांश फेर्या रद्द होतात. एके दिवशी मला एक तास वाट पाहावी लागली. फेर्या रद्द झाल्याने व गाडी उशिरा आल्याने लोकलसारखी गर्दी मोनोरेलमध्ये होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मोनोरेलमध्ये चढतात. एकदा मी चेंबूरला जात असताना तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून वडाळा डेपो येथे गाडी रिकामी केली व तीच गाडी फिरून संत गाडगे महाराज चौक स्थानकाच्या दिशेला गेली. मोनोरेलकडे गाड्यांची संख्या कमी असल्याने असे केले जाते. स्थानकावरील कर्मचार्यांना या प्रकारांबाबत काहीही कल्पना नसते. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न पडतो. स्थानकांतून बाहेर पडल्यास इतरत्र पोहोचण्यासाठी प्रवासाची कोणतीही सोय उपलब्ध नाही.मंगेश राणे, प्रवासी