मुंबई : पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झालेला असतानाच तांत्रिक कारणामुळे मोनो रेल्वे सुद्धा बंद पडली. वडाळा ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील मोनोरेल सकाळी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या गाडीतील 17 प्रवाशांना महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी 7.40 वाजता सुखरुप बाहेर काढले. तब्बल दोन तासानंतर गाडीतील बिघाड दुरुस्त करून गाडी पुढे नेण्यात आली.
वडाळा ते जेकब सर्कल मार्गिकेवरून धावणारी मोनोरेल गाडी बंद पडल्याचे समजताच एमएमएमओसीएलच्या अधिकारी-कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. मात्र अग्निशमन दल येण्याआधीच एमएमएमओसीएलच्या अधिकारी-कर्मचार्यांनी समोरच्या रुळावर दुसरी गाडी आणून बंद गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले आणि दुसर्या गाडीने पुढील स्थानकावर सुखरुप नेले.
तब्बल दोन तासांनंतर वडाळा ते जेकब सर्कल मार्गिकेवरील सेवा पूर्ववत झाली. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एमएमएमओसीएलने दिलगिरी व्यक्त केली असली तरी प्रवाशांनी मात्र मोनोरेल सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पावसात रेल्वे रुळावर पाणी भरते, त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होते. अशावेळी हार्बर मार्गिकेवरील प्रवासी उन्नत मोनोरेल मार्गिकेचा पर्याय स्वीकारतात. सुकर प्रवासासाठी निवडलेली मोनोरेलच बंद पडल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.