डोंबिवली : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून गृह विभागाने अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सज्ज असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन (Mobile Forensic Van) कल्याण-डोंबिवलीतील पोलिसांच्या दिमतीला दिली आहे. या मोबाईल लॅबच्या माध्यमातून किचकट गुन्ह्यांचा अतिजलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत होणार आहे.
पोलिस परिमंडळ ३ मध्ये कल्याणात महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा आणि कोळसेवाडी, तर डोंबिवलीत रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर आणि मानपाडा अशी ८ पोलिस ठाणी आहेत. यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यानंतर तातडीने पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सज्ज असलेल्या या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर तज्ञासह या व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात येईल.
सदर व्हॅनमध्ये भौतीक, रासायनीक, जैवीक व डिजीटल पुरावे गोळा करण्याकरिता किट्स, रसायने व साधनसामुग्रीच्या साह्याने परिक्षण/चाचणी करून अहवाल लवकर उपलब्ध होतील. या व्हॅनमुळे तात्काळ पुरावे गोळा करून, तातडीने अहवाल प्राप्त होण्यास मदत होईल. तसेच संबंधित आरोपीस अटक करून त्याच्या विरूध्द पुरावे न्यायालयात सादर करता येईल. परिणामी जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल होण्यास या व्हॅनमुळे मदत होणार आहे. सदर व्हॅनसह दोन टिम २४ तास कल्याणच्या नियत्रंण कक्षात उपलब्ध राहणार आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या लॅबचे लोकार्पण करून त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनची वैशिष्ट्ये
फॉरोन्सिक मोबाईल व्हॅनची रचना तीन भागात केली आहे. पहिल्या भागात ड्रायव्हर, दुसऱ्या भागात अटेण्डेंट आणि तिसऱ्या भागात प्रत्यक्ष काम करण्यासाठी लॅब आहे. प्रत्येक फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनमध्ये फॉरेन्सिक फिल्डमधील तज्ज्ञ आणि टेक्निकल सपोर्टसाठी स्टाफ असणार आहे. व्हॅनमध्ये स्फोटक पदार्थांची तपासणीसाठी आवश्यक असणारी कीट्स तसेच सायबर गुन्ह्यामध्ये तपासणीसाठी लागणारी कीट्स असणार आहेत. या लॅबच्या मदतीने ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा वापर करून क्राईम सीन अॅप्लिकेशन गुन्ह्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करता येणार आहे. तपासणीदरम्यान मिळालेले पुरावे, रक्ताचे सॅम्पल यांचे योग्यप्रकारे जतन करून बारकोडद्वारे सीसीटीव्हीच्या नजरेखाली ते सुरक्षित करण्यात येणार आहे.
गुन्हेगारांवर बसणार वचक
फॉरोन्सिक मोबाईल व्हॅनमध्ये रक्त, डीएनए टेस्टिंग सॅम्पल आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष घटनेवरील महत्त्वाचे पुरावे गोळा करता येणार.
प्रत्येक मोबाईल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही आहेत. जे पोलीस यंत्रणेशी जोडलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना एखाद्या गुन्ह्यात गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती लगेच देता येणे शक्य होणार आहे. टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेल्या या मोबाईल व्हॅनमुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. त्यामुळे या व्हॅनमुळे गुन्हेगारांवर वचक बसणार असून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे कामकाज
जेव्हा एखाद्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाईल. तेव्हा पोलिस नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला याची माहिती देईल. त्या माहितीच्या आधारे फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देईल. घडलेल्या गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये त्याची नोंद करतील. मोबाईल व्हॅनमधील फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे फोटो काढून आणि त्याचे शुटिंग करतील. त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून गोळा केलेल्या पुराव्यांची तपासणी करून ते सील केले करतील. त्यानंतर त्या माहितीवर आधारित क्राईम सीन रिपोर्ट तयार करून तो संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव्यांची छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होवून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे.