मुंबई: बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेल्या आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) परवाना निलंबित केलेल्या आमदार निवासातील कॅन्टीनवरील (अजिंठा केटरर्स) कारवाई अवघ्या महिनाभरातच मागे घेण्यात आली आहे. कॅन्टीनमध्ये कोणतेही अवैध खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत, असे कारण देत FDA ने उपाहारगृहाला 'क्लीन चिट' दिली आहे. यामुळे FDA ने केलेली कारवाई केवळ 'नावापुरती' होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न दिल्याचा आरोप करत आमदार निवासातील 'अजिंठा केटरर्स' या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर आमदार निवासमधील कॅन्टीनमधील अन्नपदार्थांच्या दर्जाचा विषय चांगलाच गाजला. केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर विधानसभेमध्येही याबाबत चर्चा झाली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते.
विधानसभेच्या निर्देशानंतर अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनची तपासणी केली होती. तपासणीनंतर, परवानाधारक कायद्यातील तरतुदींचे गंभीर उल्लंघन करून अन्न पदार्थ साठवणूक, तयार करणे व विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याचे कारण देत FDA ने कॅन्टीनचा परवाना निलंबित केला होता.
मात्र, आता FDA ने या उपाहारगृहाला दिलासा दिला आहे. उपाहारगृहामध्ये कोणतेही अवैध खाद्यपदार्थ आढळून आले नसल्याचे सांगत विभागाने सुरुवातीला केलेले सर्व आरोप मागे घेतले आहेत. परिणामी, 'अजिंठा केटरर्स'वरील निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेण्यात आली आहे. आमदाराच्या मारहाणीनंतर इतका गंभीर राजकीय आणि प्रशासकीय मुद्दा होऊनही, FDA ने इतक्या कमी कालावधीत कारवाई मागे घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.