Government Officials Assets
मुंबई : धुळे येथील शासकीय विश्रामगृहात आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये कोट्यवधी रुपयांची रोख सापडल्यामुळे आता महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकांवर पोलिसांची करडी नजर आहे. खासगी सचिव, स्वीय सहाय्यक , विशेष कार्य अधिकारी आदींच्या मालमत्तांची माहिती घेतली जात आहे. धुळे प्रकरणानंतर गृह खात्याने असे आदेश दिले आहेत.
धुळे येथील शासकीय विश्रामगृहात अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये कोट्यवधी रुपयांची रोख सापडली होती. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली. यावेळी महायुतीचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मंत्र्यांची खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक नेमताना, त्यांची माहिती घेतली होती. आणि मुख्यमंत्री कार्यालयातून नेमणुका करण्यात आल्या होत्या. यावर मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेतला होता. तरीही मुख्यमंत्री फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यावरच ते थांबलेले नाहीत. मंत्र्यांच्या कारभारावर त्यांची नजर आहे. यामुळे मंत्री आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी धास्तावले आहेत.
गृह खात्याने आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक गैरव्यवहार करत आहेत का? त्यानी कुठे मालमत्ता घेतल्या आहेत, त्यांचे पैसे ठेवणारे दलाल कोण आहेत, याची बारीक माहिती घेतली जात आहे. पोलिसांची करडी नजर आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकाबाबत लोकांच्या तक्रारी आल्या असतील तर तातडीने सापळा रचा, असे आदेश आहेत. यामुळे मंत्रालयात दलाली करणार्या अधिकार्यांची आता फजिती होणार आहे.
काही मंत्र्यांच्या कार्यालयात काही खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक, ओएसडी हे लोकांशी उद्दामपणे वागतात. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी गेल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या कार्यालयातील एक विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी, आदेश दिलेले असताना, बेफाम उद्दटपणे वागतात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवितात. मुख्यमंत्री कार्यालयातून एखाद्या कामासाठी विचारणा केली तर दबाव आणू नका, अशी भाषा बावनकुळेचे हे ओएसडी वापरतात. असे प्रकार काही मंत्र्यांच्या कार्यालयात होत आहेत. यामुळे लोकांची गर्दी मंत्रालयातील घटली आहे.