मुंबई : दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुधाचा सध्याचा घाऊक दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये करण्यात येणार आहे.
मुंबईत हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंग यांनी दिली.
जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतींबरोबरच दाणा, तूरचुणी, चणाचुणी आदी पशुखाद्यांच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच चारा, पेंड आदींच्या किमतीतही वाढ झाल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगण्यात आले.
या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून हा दर प्रतिलिटर ९ रुपयांनी वाढवून १०२ रुपये करण्यात आला असून, दूध उत्पादकांना वाढत्या खर्चातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई दुग्ध उत्पादक संघाकडून स्पष्ट करण्यात आले.