FDA Action pudhari photo
मुंबई

FDA Action: मुंबईत दूध विक्री केंद्रांवर एफडीएची धडक कारवाई; ५६४ लिटर दूध नष्ट

सात आस्थापनांचे परवाने निलंबित, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील दूध विक्री केंद्रे आणि डेअरींमधील अनियमितता उघडकीस आली असून, अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवार आणि शनिवारी गोवंडी, मानखुर्द, अँटॉप हिल, चेंबूर, धारावी आणि माहीम परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली.

या कारवाईत एकूण ५६४ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

गोवंडीतील साईनाथ डेअरी अँड फरसाण मार्टमधून ४५ लिटर, तर मानखुर्द येथील महाराणा डेअरीतून ४० लिटर संशयास्पद सुटे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. दोन्ही ठिकाणांहून दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित डेअरींवर कारवाई करण्यात आली. मानखुर्द येथील अगस्ती मिल्क एजन्सीचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू असून, गोवंडी पूर्व येथील यादव डेअरी विनापरवाना सुरू असल्याचे आढळले.

अँटॉप हिल येथील सागर मिल्क सेंटरमध्येही तपासणी करण्यात आली. दुधाची साठवणूक आणि विक्री करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले.

धारावीतील शक्ती डेअरीमधून ३१ लिटर, तर माहीम पश्चिम येथील राहुल मिल्क सेंटरमधून १९८ लिटर कच्चे सुटे गायीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. या दोन्ही ठिकाणांवर परवाना निलंबनाची कारवाई सुरू आहे.

दरम्यान, ग्रेटर मुंबईत २२ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्वतंत्र कारवाईत ४ लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी सात नमुने घेण्यात आले असून, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात २३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, अस्वच्छ स्वयंपाकघर, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, अनधिकृत खाद्यरंगांचा वापर व कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव आढळल्याने मुंबईतील सात आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

त्यामध्ये अंधेरी पश्चिम येथील ऑटोमन कॅफे, चाचा ईगल कुल्फी फालुदा, भारत कॅन्टीन, ग्रीन टर्टल हॉस्पिटॅलिटी, भायखळा येथील अतुल टिफिन, लोअर परळ येथील मुंबई दरबार फॅमिली रेस्टॉरंट आणि सेवरी पश्चिम येथील पी. बी. एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे.

नवी मुंबईत ३३ हजार किलो राजमा-कडधान्ये जप्त

निकृष्ट दर्जाचा संशय आणि चुकीचे लेबलिंग असलेल्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी राज्यभर धडक कारवाई केली. विशेष तपासणी मोहिमेत एकूण ३७ हजार ९९१.४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ५४ लाख ६६ हजार रुपये आहे.

यामध्ये कोकण विभागातील नवी मुंबई येथील मे. आरडीसी अ‍ॅग्रो व्हेंचर्स प्रा. लि. या आस्थापनेतून ३३ हजार २८६ किलो राजमा व कडधान्ये जप्त करण्यात आली. यामध्ये १० हजार ९९८ किलो रेड राजमा आणि २२ हजार २८८ किलो बुलेट पल्सेस राजमा यांचा समावेश आहे. या साठ्याची किंमत ५० लाख चार हजार ५८० रुपये आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतही विविध अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT