Mumbai Metro Cat: मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात रोज काही ना काही वेगळं घडत असतं. मात्र यावेळी मुंबई मेट्रोच्या गुंडावली स्टेशनवर एका मांजरीने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्टेशनमधील एका काळ्या पॉलिश केलेल्या कठड्यावर अगदी आरामात पहुडलेली ही नारिंगी रंगाची मांजर पाहून एका प्रवाशाने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर सुरू झालेल्या मजेशीर चर्चेने या मांजरीला थेट मुंबई मेट्रोचा ‘Chief Feline Officer’ बनवलं!
मुंबईतील रहिवासी संदेश सामंत यांनी या मांजरीचा फोटो शेअर करत मजेशीर मागणी केली होती. ही निरागस मांजर स्टेशनवर इतकी नियमित दिसते, मग तिला एखादं अधिकृत पद द्यायला हवं, कारण ती सध्या कोणताही पगार न घेता काम करत असल्याची गंमतीशीर टिप्पणी त्यांनी केली.
हा फोटो पाहिल्यानंतर मुंबई मेट्रोच्या ऑपरेटरनेही तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. मेट्रोने या मांजरीला आपला ‘Chief Feline Officer’ असल्याचं म्हटलं. तिची कामंही ठरवण्यात आली. स्टेशनची पाहणी करणे, प्रवाशांवर लक्ष ठेवणे आणि स्टेशनवर अशा ठिकाणी बसणे की जिथे प्रत्येकाचं लक्ष तिच्याकडे जाईल, अशा तिच्या जबाबदाऱ्या असल्याचं मेट्रोने विनोदाने म्हटलं.
इतकंच नाही तर, या ‘अधिकाऱ्या’ची कामगिरी आतापर्यंत अगदी ‘purrfect’ असल्याचंही मेट्रोने म्हटलं. मेट्रोच्या या भन्नाट उत्तरानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
काही नेटकऱ्यांनी गुंडावली स्टेशनचं नाव बदलून ‘Meowdavli’ ठेवण्याची गंमतीशीर सूचना केली. तर काहींनी या मांजरीला ‘संत्री बिल्ली’ म्हणजेच स्टेशनची पहारेकरी म्हटलं. काही जणांनी तिच्याकडे संपूर्ण स्टेशनच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचा विनोद केला. ‘End-to-end feline security’ अशा कमेंट्सही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या.
या पोस्टमुळे अनेक प्रवाशांनी या मांजरीबद्दलचे आपले अनुभवही शेअर केले. एका प्रवाशाने सांगितलं की, ही मांजर गेल्या जवळपास तीन वर्षांपासून स्टेशनवर पाहत आहे. काही काळ तिच्यासोबत आणखी एक मांजरही दिसायचं, अशी आठवणही त्याने सांगितली.
तर दुसऱ्या एका प्रवाशाने गुंडावलीहून प्रवास करताना या मांजरीला भेटण्यासाठी आपण नेहमी थांबत असल्याचं म्हटलं. मुंबई मेट्रोच्या या ‘Chief Feline Officer’चा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स, कमेंट्स व रिपोस्ट मिळाले आहेत.