Mumbai Metro Accident Pudhari file photo
मुंबई

Mumbai Metro : मेट्रोसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू, विक्रोळीतील घटना

विक्रोळी पार्कसाईट पोलिसांकडून संबंधित कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : दुचाकीवरून जाणाऱ्या एका इसमाच्या अंगावर रस्त्यालगत लावण्यात आलेला बॅरिकेट्स पडल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी विक्रोळी परिसरात घडली आहे. मेट्रोच्या कामादरम्यान ही घटना घडली असून याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी संबंधित कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

वसी हैदर (५४) असे यातील मयत इसमाचे नाव असुन ते घाटकोपरच्या गौसिया चाळ येथे राहत होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते प्लबिंगचे काम करण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून मुलुंड परिसरात जात होते. विक्रोळीच्या एलबीएस मार्गावरून जात असताना येथील रोझरी इमारतीसमोर अचानक त्यांच्या अंगावर रस्त्यालगत लावण्यात आलेला एक लोखंडी बेरीकेड पडला. येथील दुभाजकावर हा बेरिकेड उभा करण्यात आला होता. या अपघात वसी हे गंभीर जखमी झाले होते. काही नागरिकांनी तत्काळ त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच येथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. दरम्यान १४ फेब्रुवारीला याच मार्गामधील मुलुंड येथील एलबीएस मार्गावर देखील मेट्रोचा पॅरापेट स्लॅब एका रिक्षावर पडल्याची घटना समोर आली होती. या भीषण दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर ३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर याच महिन्यात १२ सप्टेंबरला वडाळा येथील भक्ती पार्क मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान लोखंडी रॅम्प कोसळल्याने २ कामगारांचा मृत्यू झाला आहे.या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा मेट्रो अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने मेट्रोच्या कामावर सध्या प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

संबंधित कंपनीवर गुन्हा

शुक्रवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी हैदर यांच्या मुलाच्या तक्रारीवरून मेट्रोचे काम करणारी संबंधित कंत्राटदार कंपनी, या कंपनीत काम करणारा सुपरवायझर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरी यामध्ये कोणालाही अटक करण्यात आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT