मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करताना बस, मेट्रो, रेल्वे अशा विविध प्रवासी साधनांचा वापर दिवसभरात करावा लागतो. प्रत्येक प्रवासी साधनासाठी वेगळे तिकीट काढावे लागते. मात्र आता प्रवाशांचे हे कष्ट वाचणार आहेत. एकाच अॅपवरून एकाच तिकिटाद्वारे बस, मेट्रो आणि रेल्वेने प्रवास करता येणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून 'मुंबई वन' अॅप विकसित करण्यात आले आहे.
सध्या मेट्रो १ने प्रवास करण्यासाठी 'वनतिकीट' अॅपद्वारे तिकीट काढले जाते. बेस्ट बससाठी 'चलो' अॅप वापरले जाते. 'यूटीएस' अॅपवरून रेल्वेचे तिकीट काढले, 'यूटीएस' अॅपवरून रेल्वेचे तिकीट काढले जाते. मात्र हे सर्व अॅप्स खासगी आहेत. 'मुंबई वन' हे अॅप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) विकसित करण्यात आले आहे. या अॅपवरून सर्व मेट्रो मार्गिका, उपनगरीय रेल्वे, बेस्ट, केडीएमसी, एनएमटी, टीएमटी बससेवा यांचे तिकीट काढता येईल.
प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण व जेथे जायचे असेल ते ठिकाण यांची माहिती अॅपवर दिल्यानंतर किती अंतरावर कोणती प्रवासी साधने उपलब्ध आहेत. तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती दिली जाईल. संपूर्ण प्रवासासाठी एकत्रित तिकीट काढता येईल. हे अॅप मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान मार्गावर असणाऱ्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचीही माहिती दिली जाईल.
८ ऑक्टोबरला लोकार्पण
पंतप्रधान मोदी ८ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याहस्ते नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, मेट्रो २ ब चा पहिला टप्पा यांसोबतच मुंबई वन अॅप आणि स्मार्ट कार्डचेही लोकार्पण होईल.