मुंबई : प्रवासी संख्या वाढवणे हे मेट्रोसमोरील मोठे आव्हान असताना मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या संयुक्त मार्गिकेवर आता तीन नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे दररोज 21 फेर्या वाढल्या असून 52 हजार 500 प्रवाशांची भर पडली आहे.
नुकताच या मार्गिकेने दैनंदिन प्रवासीसंख्येत 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. 3 लाखांहून अधिक प्रवासीसंख्या पार करणे हे केवळ एक आकडेवारीच्या संदर्भातील यश नाही, तर आमच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचा आणि गेल्या काही काळात निर्माण केलेल्या विश्वासार्हतेचा ठोस पुरावा असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
एमएमआरडीएने महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) या आपल्या कार्यान्वयन संस्थेच्या माध्यमातून मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गिकांवर दैनंदिन फेर्यांची संख्या 284 वरून 305 पर्यंत नेली आहे. एक गाडी प्रत्येक फेरीत साधारण 2 हजार 500 प्रवासी वाहून नेते. त्यामुळे वाढीव 21 फेर्यांमध्ये 52 हजार 500 अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
गर्दीच्या वेळेस मेट्रोच्या दोन फेर्यांमधील प्रतीक्षा कालावधी 6 मिनिटे 35 सेकंदांवरून 5 मिनिटे 50 सेकंदांवर आणण्यात आला आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. फेर्या पूर्वीप्रमाणे 9 मिनिटे 30 सेकंदांच्या अंतरानेच सुरू राहतील, जेणेकरून ऊर्जाबचत आणि संचालनात संतुलन राखता येईल.
दर आठवड्याला सुमारे 5 टक्केने वाढणारी प्रवासीसंख्या पाहता फेर्या वाढविण्यात आल्या आहेत. ‘मुंबई इन मिनिट्स’ या आमच्या व्हिजनअंतर्गत मेट्रो प्रवास हा शहरी वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त