मुंबई : मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचे सर्वांत पहिले स्थानक असणार्या आरे जेव्हीएलआर स्थानकाला रोपवेची जोडणी दिली जाणार आहे. रोपवेने फिल्मसिटीपर्यंत प्रवास करणे शक्य होईल. रोपवेमुळे पर्यटनस्थळी आणि नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होईल.
आरे मेट्रो स्थानक ते फिल्मसिटीपर्यंतचा रोपवे साधारण 2 ते 3 किमीचा असेल. यावरून एका दिशेला प्रतितास 2 ते 3 हजार प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारल्या जाणार्या या मार्गिकेचे नियोजन, बांधकाम, विकास, संचालन खासगी कंपनीद्वारे केले जाईल व त्यानंतर ती एमएमआरसीएलला हस्तांतरित केली जाईल.
रोपवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. भुयारी मेट्रोची प्रवासीसंख्या वाढवण्यासही मदत होईल. भुयारी मेट्रोतून आलेले प्रवासी रोपवेने थेट फिल्मसिटीमध्ये जाऊ शकतील. त्यामुळे त्यांना रस्त्याने प्रवास करण्याची गरज भासणार नाही.