मुंबई : रेल्वेची गर्दी आणि रस्ते वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो मार्गिका उभारल्या जात आहेत. तसेच मेट्रोच्या आधी मोनोरेलचाही प्रयोग करण्यात आला. सध्या मेट्रो आणि मोनो या सर्व मार्गिकांवर मिळून दररोज जवळपास 10 लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गिका जून 2014मध्ये सुरू करण्यात आली. 12 स्थानके असलेल्या या मार्गिकेवरून दररोज 5 लाख 66 हजार 851 प्रवासी प्रवास करतात. त्यानंतर अंधेरी-दहिसर-गुंदवली या 35 किमी मार्गिकेची सुरुवात 2022-23 साली झाली. या मार्गिकेवर 3 लाख 35 हजार 69 प्रवासी प्रवास करतात. साधारण वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरून दररोज 76 हजार 177 प्रवासी प्रवास करतात. तसेच मोनोरेलने दररोज 12 हजार 235 प्रवासी प्रवास करतात. सर्व मार्गिकांची मिळून एकूण प्रवासी संख्या 10 लाखांच्या उंबरठ्यावर आहे.
लवकरच मुंबईत मेट्रो 9, मेट्रो 2ब आणि मेट्रो 4 या मार्गिकांवरही मेट्रोगाड्यांचे संचालन सुरू होणार आहे. त्यानंतर मेट्रोच्या एकूण प्रवासी संख्येत आणखी भर पडेल. मेट्रो 2 अ, 7 आणि मेट्रो 3 या मार्गिकांना अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आलेली नाही. मात्र हळूहळू मुंबईकरांची पावले मेट्रोकडे वळत आहेत. मोनोरेलबाबत साशंकता असली तरीही नोव्हेंबरपर्यंत या मार्गिकेवर नव्या गाड्या येतील व त्यानंतर प्रवासी संख्या वाढण्याची आशा आहे.