मुंबई : सुरू झाल्यापासून तांत्रिक बिघाडांनी ग्रासलेल्या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवर शुक्रवारी पुन्हा एकदा खोळंबा झाला. मेट्रोगाडी तासभर बोगद्यात अडकून पडल्याने प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. तसेच दोन्ही दिशांच्या वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
शुक्रवारी दिवसभरात दोनदा भुयारी मेट्रोची सेवा विस्कळीत झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले; मात्र नेमकी कुठे आणि किती वाजता मेट्रोगाडी बंद पडली याबाबत एमएमआरसीएलकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस मेट्रोगाडी बंद पडल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. सकाळी 10 वाजल्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे दुपारपर्यंत ही मार्गिका विस्कळीतच होती. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढवली.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.45च्या सुमारास धारावी मेट्रो स्थानकातून प्रवास सुरू केल्यानंतर मंत्रालयात पोहोचायला दोन तास लागले. त्यापैकी सव्वा तास मेट्रो बोगद्यातच अडकली होती. या मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला होता. पुरेशी माहिती मिळत नसल्याने प्रवासी आणि मेट्रो कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाले. मेट्रोगाडी 30 मिनिटे बोगद्यात अडकल्याचे एमएमआरसीएलकडून सांगण्यात आले.
ऑक्टोबर 2024मध्ये भुयारी मेट्रोचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू झाला. त्यानंतर मे 2025पर्यंत ही मेट्रो वरळीपर्यंत धावू लागली. त्यानंतर ऑक्टोबर 2025पासून आरे ते कफ परेड अशी 33.5 किमीची मेट्रो मार्गिका सुरू झाली. सुरू झाल्यापासून या मार्गिकेवर अधूनमधून काही तांत्रिक बिघाड होतच आहेत. शुक्रवारी अशाचप्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रोगाडी बोगद्यात अडकली.
आपत्कालीन दरवाजा का उघडत नाही ?
मेट्रो सव्वा तास बोगद्यात अडकल्याचे प्रवासी सांगत असले तरी एमएमआरसीएलने ही गोष्ट नाकारली आहे. मात्र नेमकी किती वेळ गाडी बंद पडली होती याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. बराच वेळ मेट्रो बोगद्यात अडकूनही आपत्कालीन दरवाजा उघडण्यात आला नाही. यापूर्वीही 9 नोव्हेंबर 2024 रोजी मेट्रो बोगद्यात बंद पडली होती. यावेळीही आपत्कालीन दरवाजा उघडण्यात आला नव्हता. या दरवाजाचा वापर नेमका कोणत्या परिस्थितीत केला जाईल, याची माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली नाही.
तिकिटांचा परतावा त्वरित नाही
मेट्रोचे तिकीट विविध ॲप्सवरून काढता येते. स्थानकात नेटवर्क नसल्याने प्रवासी स्थानकाबाहेर असतानाच उबेर, रॅपिडो अशा ॲप्सवरून तिकीट काढतात. मेट्रोमध्ये तांत्रिक अडचण आल्यानंतर केवळ कागदी तिकिटांचाच परतावा त्वरीत देण्यात आला. ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्यांना कस्टमर सपोर्टकडे तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.
चित्रीकरणास बंदी ?
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोमध्ये प्रवासी अडकलेले असताना कोणी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आहेत का, कोणी चित्रीकरण करत आहे का, यावर लक्ष ठेवले जात होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा मेट्रो प्रशासनाला स्वत:ची प्रतिमा जपणे आवश्यक वाटल्याची खंत प्रवाशांना आहे.