मुंबई : मराठा आंदोलकांचा मुंबईतील मुक्काम वाढल्याने सोमवारपासून दळणवळणाचा गंभीर पेच निर्माण झाला आहे. गेले तीन दिवस दक्षिण मुंबईत जाणे टाळलेल्या नोकरदार मुंबईकरांपुढेही सोमवारी कामावर जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि सीएसएमटी जंक्शन येथे ठिय्या दिला आहे. सकाळपासून रात्री उशिरापार्यंत या परिसरातील दळणवळण ठप्प झाले आहे.
शनिवारीही हजारोंच्या संख्येने वाहनांसह आंदोलक मुंबईत दाखल झाले. त्यामुळे पूर्वमुक्त मार्ग, अटल सेतू अशा मुंबईत येणार्या महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सीएसएमटी परिसर आणि पूर्वमुक्त मार्ग या भागातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
रस्त्यांवर उभ्या केलेली वाहने काढण्यात शनिवारी रात्रीपर्यंत काही प्रमाणात यश आले; मात्र आंदोलन सुरूच असल्याने सीएसएमटी जंक्शनचा परिसर अद्याप मोकळा होऊ शकलेला नाही. महानगरपालिका मुख्यालयासमोरचा रस्ता पूर्णपणे आंदोलकांनी भरून गेल्यामुळे या रस्त्यावर इतर वाहने जाऊ शकत नाहीत. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने मुंबईतील नोकरदार वर्गाला अद्याप या आंदोलनाची झळ बसलेली नाही. मात्र आज, सोमवारी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये सुरू झाल्यानंतर कामानिमित्त सीएसएमटी परिसरात प्रवास करणार्या नोकरदार वर्गाची कोंडी होणार आहे. मोठ्या संख्येने आंदोलक उपनगरे व नवी मुंबई परिसरात मुक्कामास आहेत. ते सकाळी उठून आंदोलनस्थळी रेल्वेने येत आहेत. त्यामुळे आधीच गर्दी त्यात आंदोलकांची भर पडणार असल्याने लोकल सेवेवर परिणाम होणार असून मुंबईकर नोकरदारांची मोठी गैरसोय होणार आहे.
मराठा आंदोलक दिवसभर दक्षिण मुंबईत आंदोलनात सहभागी होत असून मुक्कामला उपनगरात विशेषत: नवी मुंबई परिसरात येत आहेत. गेले दोन दिवस शनिवार व रविवार असल्याने रेल्वेने नियमीत प्रवास करणार्या मुंबईकरांनी प्रवास टाळला. त्यामुळे फारसा रेल्वे सेवेवर परिणाम दिसून आला नाही. मात्र सोमवारी नियमीत प्रवाशी त्यात आंदोलक अशी भर पडणार असून लोकल सेवेवर प्रचंड ताण येणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलन आणि पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनामुळे रविवारी मुंबईतील बेस्ट बस वाहतुकीची मोठी कोंडी झाली. आंदोलकांचा प्रचंड जमाव आणि विसर्जन मिरवणुकांमुळे बेस्ट उपक्रमाला तब्बल 70 पेक्षा जास्त बसमार्ग वळवावे लागले, तर काही मार्ग बंदही करण्यात आले.
बेस्ट ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार, सकाळी 7.15 पासूनच सीएसएमटी, मॅडम कामा रोड, जगन्नाथ भोसले मार्ग, महापालिका मार्ग, एल.टी. मार्ग, दादर, मेट्रो सिनेमा आणि एम.जी. रोड परिसरात बस वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. रस्त्यांवरील गर्दी आणि पोलिसांनी केलेल्या बंदोबस्तामुळे 53, 5, 15, 82, 126, 138, 131, 103, 124 या बसमार्गांचे नियोजन बदलले. काही बसेस क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक, पोद्दार चौक, मेट्रो सिनेमा आणि शाहिद भगत सिंह रोडकडे वळवण्यात आल्या. तर दुपारी अडीच वाजल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरातील -112, -116 तसेच सीएसएमटी परिसरातील -138 हे मार्ग मोठ्या गर्दीमुळे पूर्णपणे स्थगित करण्यात आले. जुहू चौपाटीवरील 231 मार्गही थेट रद्द करण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे लालबाग, दादर चौपाटी आणि शिवाजी पार्क परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बेस्टने खास उपाययोजना केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील 1, 4, 6, 7, 8, 11, 15, 19, 21, 22, 25 हे मार्ग लालबाग फ्लायओव्हर मार्गे वळवले गेले. सकाळी 6 ते 7.20 आणि दुपारी 2 ते 2.35 वाजेपर्यंत या मार्गांत बदल केला आहे.
शिवाजी पार्क व विसर्जन मार्गावरून जाणार्या 72, 718, 706, 707, 709 या बसेसना ‘गोल्डन नेस्ट’ मार्गे वळवले. टँक रोडवरील 612, 606, 605 या बसेसना एल.बी.एस. रोडमार्गे वळवले.