Dengue Malaria Pudhari
मुंबई

Mumbai Malaria Cases: चाचण्या वाढल्या; मलेरियावर मात अजून दूरच! संसर्ग निर्देशांकाची वाढ चिंताजनक

२०२५ मध्ये १८.८९ लाख नमुने तपासले; १०,१६३ रुग्ण पॉझिटिव्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मलेरिया नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात असला, तरी पालिकेनेच उपलब्ध करून दिलेली आकडेवारी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

गेल्या वर्षी मलेरियाच्या चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी वार्षिक मलेरिया परजीवी संसर्ग निर्देशांक (एपीआय) सातत्याने वाढल्याने डास नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांना महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये १४ लाख २८ हजार २६५ रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी वार्षिक रक्त तपासणी दर (एबीईआर) ११.३ टक्के होता.

२०२४ मध्ये १५ लाख १६ हजार ६५५ नमुने तपासण्यात आले आणि एबीईआर ११.७ टक्के राहिला. मात्र, २०२५ मध्ये तपासण्यांमध्ये मोठी वाढ झाली. तब्बल १८ लाख ८९ हजार १२ रक्तनमुने तपासण्यात आल्याने एबीईआर थेट १४.५ टक्क्यांवर पोहोचला.

जून २०२६ पर्यंत ७ लाख ६१ हजार ४३९ रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३ हजार ३९४ नमुने मलेरियासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मागील वर्षी गाठलेला १४.५ टक्के एबीईआर कायम ठेवतानाच एपीआय कमी करण्याचे दुहेरी आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.

केवळ रक्त तपासण्यांची संख्या वाढवून मलेरिया नियंत्रणात येणार नाही. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, डास नियंत्रणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे, संक्रमित रुग्णांची तातडीने ओळख करून उपचार करणे आणि मलेरियाच्या स्रोतांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

मुंबईत मलेरियाच्या चाचण्या वाढल्या असल्या तरी रुग्णांचा संसर्ग निर्देशांक कमी करण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याचे ही आकडेवारीवरून दिसून येत आहे.

संसर्ग निर्देशांकाची वाढ चिंताजनक

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात महापालिकेला यश आले असले, तरी वार्षिक मलेरिया परजीवी संसर्ग निर्देशांकाची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. २०२२ मध्ये ०.३ असलेला एपीआय २०२३ मध्ये ०.५, २०२४ मध्ये ०.६ आणि २०२५ मध्ये ०.८ वर पोहोचला.

म्हणजेच चाचण्या वाढवून अधिक रुग्ण शोधले जात असतानाच मलेरियाचा संसर्ग निर्देशांकही वाढत आहे. २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये स्लाईड पॉझिटिव्हिटी रेट (एसपीआर) ०.५ टक्के राहिला. २०२५ मध्ये तपासलेल्या १८.८९ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १० हजार १६३ नमुने मलेरियासाठी पॉझिटिव्ह आढळले.

एपीआय म्हणजे काय?

वार्षिक मलेरिया परजीवी संसर्ग निर्देशांक म्हणजे एका वर्षात प्रति १,००० लोकसंख्येमागे आढळणाऱ्या मलेरियाच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT