Malad Fishing Boat Fire
मालाड : भाटी कोळीवाडा येथील भाटी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या महिला सभासद रेश्मा मोझेस धाके यांच्या सी प्रिन्सेस या मासेमारी नौकेला खोल समुद्रात मासेमारी करत असताना स्टोव्ह अथवा गॅसचा भडका उडाल्याने आग लागली.
घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड, मत्स्यव्यवसाय विभाग व येलो गेट पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेत एका खलाशाच्या दोन्ही पायांना व एका हाताला दुखापत झाली असून त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या आगीत नौका मालक रेश्मा धाके यांचे अंदाजे ४० लाखांहून अधिक नुकसान झाले असून त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली आहे.