Mumbai Local Train Fight Video Pudhari
मुंबई

Mumbai Local Train Fight Video: धक्कादायक! मुंबई लोकलमधील प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; चालत्या ट्रेनमधून प्रवासी थेट प्लॅटफॉर्मवर पडला

Mumbai Local Train Fight Video: सुदैवाने मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवेश करताना लोकलचा वेग कमी असल्याने प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.

Rahul Shelke

Mumbai Local Train Fight Video: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी रात्री चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणादरम्यान एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो थेट चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडला. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी जलद लोकल ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान असताना दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहण्याच्या जागेवरून हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांमधील भांडण वाढत गेले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. दरम्यान, लोकल मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवेश करत असताना हाणामारीला हिंसक वळण लागले.

याचवेळी एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो दरवाजातून थेट प्लॅटफॉर्मवर पडला. सुदैवाने स्थानकात प्रवेश करताना लोकलचा वेग कमी होता. त्यामुळे संबंधित प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही.

या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गर्दीच्या वेळी दरवाजाजवळ उभे राहण्यावरून होणारे वाद आणि त्यातून घडणाऱ्या अशा घटना धोकादायक ठरत आहेत. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT