मुंबई: मुंबईमध्ये बुधवारी मध्यरात्री धो.. धो.. ओतलेला पाऊस, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात फारसा लागलाच नाही. त्यामुळे तलाव तहानलेलेच असून मुंबईकरांवरील संभाव्य भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
मुंबई शहरात पावसाने दमदार आगमन केलेले असताना मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे विहार तुळशी वगळता ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तलावांतील पाणीसाठ्यात घट सुरूच आहे. ६ तलावांमध्ये आता फक्त ७.७३ टक्के पाणीसाठा म्हणजेच १ लाख ११ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावामध्ये ४८ हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तानसा तलाव पूर्णपणे आटत असून जेमतेम दीड टक्के पाणी शिल्लक आहे. अन्य तलावांतील पाणीसाठ्याची टक्केवारी फारशी चांगली नाही.
मुंबई शहरात काही तासांत २०० ते ३५० मिमी पाऊस झालेला असताना तलावाच्या पाणलोट क्षेत्रात विहार, तुळशी वगळता अन्य तलावांच्या क्षेत्रात २४ तासांत अवघा ३ ते ५ मिमी पाऊस झाला. भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात थेंबही पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली आहे.
शहरापेक्षा तलावांच्या क्षेत्रात पाऊस पडणे मुंबईकरांसाठी जास्त आवश्यक आहे. दिवसेंदिवस खालावत असलेला पाणीसाठा वाढवण्यासाठी व मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची आवश्यकता असल्याचे जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.