मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईत ४ ऑक्टोबर रोजी जनमोर्चा काढण्यात येणार आहे. देशातील सत्ताधारी पक्षाची जणू आपण शाखाच आहोत, अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केली आहे.
त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल, यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत, असे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे. मोर्चाची वेळ आणि ठिकाण लवकरच कळविण्यात येईल. देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असे आवाहन उद्धव आणि राज यांनी केले आहे.