मुंबई : देशातील सर्वात वर्दळीचे विमानतळ म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. विमानतळ लिमिटेडने 2025-2026 साठीचे हिवाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये 60 आंतरराष्ट्रीय व 69 देशांतर्गत ठिकाणांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना सणासुदीच्या आणि हिवाळ्यातील सुट्टीच्या काळामध्ये मनासारखा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. 26 ऑक्टोबर 2025 ते 28 मार्च 2026 असा या वेळापत्रकाचा कालावधी असणार आहे. त्यानुसार विमानसेवा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मागील वर्षीच्या हिवाळी वेळापत्रकाच्या तुलनेत यावर्षी युरोप व आशिया पॅसिफिकसाठी अधिक कनेक्शन्स देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीच्या अनुक्रमे युरोपसाठी आठ तर आशिया पॅसिफिकसाठी 16 कनेक्शन्स देण्यात आली होती. तीच 2025 मध्ये युरोपसाठी 12 व आशिया पॅसिफिकसाठी 19 गंतव्य फेर्या असतील. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी दैनंदिन विमान फेर्यांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळणार आहे. हिवाळी वेळापत्रकामध्ये एमिरेट्स, एतिहाद व ब्रिटीश एअरवेज, तर अव्वल तीन देशांतर्गत एअरलाइन्स आहेत इंडिगो, एअर इंडिया व अकासा एअर एकत्रित, या 75 टक्के योगदान देणार आहेत.
फेर्यांमध्ये 18 टक्के वाढ
यंदाच्या हिवाळी मौसमासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने विविध नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग उपलब्ध केले आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदाच कोपेनहॅगेन, डेनपासर बाली व अॅथेन्सकरिता विमान वाहतूक सेवा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे फेर्यांमध्ये 18 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. या गंतव्यांव्यतिरिक्त लंडन हीथ्रो, अॅमस्टरडॅम व पॅरिसकरिता अतिरिक्त विमानांमुळे प्रवाशांना युरोपसाठी प्रवासाचे अनेक पर्याय निर्माण होणार आहेत.