मुंबई: आग्रीपाडा परिसरातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुरु केलेल्या एमडी ड्रग्ज प्रयोगशाळेचा कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 50 कोटी 74 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य, एक देशी बनावटीचे पिस्तूल, 19 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला.
एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून, मोहम्मद शोएफ शौकतअली मंसुरी, सुफीयान सलीम मंसुरी आणि मामूनी सुनिल सरकार अशी त्यांची नावे आहेत. तिघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
यातील मोहम्मद शोएफ आणि सुफीयान हे दोघेही मांडवी तर मामूनी ही मूळची कोलकाताची रहिवाशी आहे. ती यास्मिन टॉवरमध्ये राहत होती. हा फ्लॅट तिने 50 हजार रुपये भाड्याने घेतला होता.
तिथेच तिने एमडी ड्रग्ज तयार करणारी प्रयोगशाळा सुरु केली होती. तिला इतर दोघेही मदत करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा हा कारखाना जोरात सुरू होता. आतापर्यंत त्यांनी किती ड्रग्ज तयार केले, ते मुंबईसह कुठे कुठे किती विकले याचा छडा आता लावला जाणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, एपीआय विजय नाईक, उल्हास खोलम, पोलीस उपनिरीक्षक निखील शेळके, संतोष पाटील, सहाय्यक फौजदार विनोद निकम, पोलीस हवालदार सुधाकर देसाई, भरत मोहिते, धनाजी मोहिते, भरत मोहिते, अरुण राठोड, सुभाष खेमनर, पोलीस शिपाई सतीश गवळी, संजय खरात, नरेंद्र रोकडे, हनुमंत राणे, रुपम गिभल, अविनाश गालवे, लक्ष्मण राऊत, महिला पोलीस शिपाई स्नेहा आलेकर, आशा शिखरे या पोलीस पथकाने ही कारवाई केली.