Arrest Pudhari
मुंबई

Mumbai Crime News: अंधेरीत ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना अटक

विक्रीसाठी मुंबईत आणला होता १.८९६ किलो गांजा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत हायड्रो गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची बाजारातील किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत गोंदुकुपे आणि अमली पदार्थविरोधी पथक अंधेरी पूर्व परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी ७.५० च्या सुमारास जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळ दोन तरुण संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसले.

पोलिसांनी त्यांना हटकले असता, त्यातील एकाने हातातील लाल रंगाची प्लास्टिकची पिशवी लपविण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही पोलिसांना टाळून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे हायड्रो गांजा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील तरतुदींचे पालन करून झडती घेतली.

त्यावेळी ओमकार राजेंद्र पवार (२८, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या लाल रंगाच्या पिशवीत १ किलो ८९६ ग्रॅम हायड्रो गांजा आढळला. त्याची किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये आहे. याप्रकरणी ओमकार पवार आणि पियुष मधुकर घोंगडे (२२, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली.

साताऱ्यातून मुंबईत विक्रीसाठी आले

अटक केलेले दोन्ही आरोपी सातारा जिल्ह्यातील असून, मुंबईत हायड्रो गांजाची विक्री करण्यासाठी आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२४४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT