Dadar Railway Assault: मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने महिलेवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला वारंवार लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर तो महिलेला रुळांवरुन ओढत नेत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी सातत्याने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही मारहाण सुरू असताना प्लॅटफॉर्मवर अनेक प्रवासी उपस्थित असूनही कोणीही पुढे येऊन हस्तक्षेप केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत नाही. काहीजण हा प्रकार पाहत होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची दखल घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील संबंधित पोस्टला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांच्याकडे पाठविल्याची माहिती दिली आहे.
मात्र, ही घटना नेमकी कधी घडली, संबंधित महिला आणि आरोपीची ओळख काय आहे, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रेल्वे पोलिसांकडूनही या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
दरम्यान, व्हिडिओमधील मारहाणीचे दृश्य पाहून सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेदरम्यान उपस्थितांनी मदतीसाठी पुढे न आल्याबद्दलही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.