Mumbai Transport Toll Update
मुंबई : मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच टोल नाक्यांवर अवजड वाहनांवर 2029 पर्यंत टोल आकारणी करण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.
हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला पथकरातून सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. परंतु, ती भरपाई देण्याऐवजी मुंबईतील टोलनाक्यांवरील वसुलीला तीन वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली. मुदतवाढीमुळे टोलवसुली करणार्या एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला अन्य वाहनांकडून 17 सप्टेंबर 2029 पर्यंत टोल वसूल करता येणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई प्रवेशद्वारावरील वाशी, लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील मुलुंड येथे, मुलुंड पूर्व द्रुतगती मार्ग, ऐरोली तसेच दहिसर येथील नाक्यांवर 14 ऑक्टोबर 2024 पासून पथकरातून सवलत देण्यात आली आहे. एमएसआरडीसीने या मार्गावरील टोल वसुलीसाठी एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्याशी 19 ऑक्टोबर, 2010 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीसाठी करार केला होता. मात्र, राज्य सरकारने या पाचही टोलनाक्यांवरून हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला पथकरातून सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
त्यासंदर्भात नेमलेल्या मुख्य सचिव यांच्या समितीने या प्रकल्पासाठी करारनाम्यानुसार नुकसानभरपाई देण्याकरिता शिफारस केली होती. मात्र, राज्य सरकारने भरपाई देण्याऐवजी टोलवसुलीच्या कालावधीत सुधारणा करून तो 17 सप्टेंबर 2029 पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली.
तथापि या 19 नोव्हेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2029 या कालावधीतील सर्व प्रकारच्या वाहनांची प्रत्यक्ष गणनेचा रिअल-टाईम-डाटा उपलब्ध करून देण्याची अनिवार्य अट घालण्यात आली आहे.
मुंबई व उपनगर विभागातील 27 उड्डाणपूल व अनुषंगिक बांधकामांची निगा व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे. याशिवाय, वाशी खाडीपूल या प्रकल्पासाठी पथकर सवलत नुकसान भरपाईपोटी (खाडी पूल क्रमांक 3 च्या प्रकल्पाची) सुमारे 775 कोटी 58 लाख रुपये महामंडळास भरपाईऐवजी टप्प्या-टप्प्याने रोख स्वरुपात देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.