मुंबई : 26 मे रोजी जोरदार आगमन करीत मुंबई तुंबवून गायब झालेला पाऊस शनिवारी पुन्हा परतला. मुंबई शहर व उपनगरात रात्री विजांच्या गडगटासह जोरदार पाऊस झाला. सखल भागांत काही ठिकाणी पाणी तुंबले तर वाहतूकही मंदावली होती. रेल्वेसेवा सुरळीत सुरू होती.
हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता. सकाळपासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता. परंतु सायंकाळी सहा वाजल्यानंतर दक्षिण मुंबईच्या उपनगरात पावसाने जोर पकडला. सायंकाळी कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच पळापळ झाली. छत्री नसल्यामुळे भिजत रेल्वे स्टेशन गाठावे लागले. काही सखल भागात पाणी साचले पण तातडीने निचरा झाला. पावसामुळे मुंबईच्या जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही.
शहर 2.02 मिमी
पूर्व उपनगर 1.04 मिमी
पश्चिम उपनगर 0.43 मिमी
दक्षिण मुंबईसह परेल, दादर, फ्री वे, पश्चिम द्रुतगती महामार्ग एस. व्ही. रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड व अन्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
जोरदार वारा असल्यामुळे शहर व उपनगरात 15 ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. दोन ठिकाणी किरकोळ शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.
पूर्व उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. मुलुंड येथे सायंकाळी तासात सर्वाधिक 22 मिमी तर गव्हाणपाडा येथे 15 मिमी पाऊस झाला.
ठाण्यात दिवसभरात किमान तापमान 28.8 तर कमाल तापमान 33.3 अंश सेल्सिअसवर होते. आर्द्रता पातळी 73% च्या आसपास होती .
ठाणे शहरातही रात्री जोरदार पाऊस झाला. सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. ठाण्याच्या भास्कर कॉलनी, चिखलवाडी, तबेला, भांजेवाडी भाग जलमय झाला होता. कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला.