मुंबई : मुंबईत शनिवारी सकाळी आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो.. धो.. कोसळू लागला. आणि अवघ्या तासाभरात मुंबई डुबली. उपनगरांतील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तर रस्त्यावरील वाहतुकीसह मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांसह घरी निघालेल्या विद्यार्थ्यांचे चांगले हाल झाले.
मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यानंतर पावसाने जोर धरला. हा जोर इतका होता की, अवघ्या काही मिनिटांत ठिकठिकाणी पाणी तुंबू लागले. अतिमुसळधार पावसामुळे अंधेरीचा मोगरा नाला तुडुंब भरून वाहू लागला. मोगरा नाल्याला जोडलेले लहान नालेदेखील तुडुंब भरले आहेत. परिणामी अंधेरी सबवेसह परिसरातील रस्त्यांवर पाणी तुंबून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या बेस्ट बस व खासगी वाहने अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
पावसाचा कहर इतका होता की, शाळा, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रामध्ये सुटी जाहीर करण्यात आली. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेले मुंबईकर पुन्हा आपल्या घराकडे वळू लागले. परंतु मध्य रेल्वेची लोकल सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने सुरू असल्यामुळे अनेकांना रेल्वे स्टेशनवर ताटकळत भिजलेल्या अवस्थेत वेळ काढावा लागला. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले.
पश्चिम रेल्वे ठप्प
वसई व नालासोपारा रेल्वे मार्गात पाणी आल्यामुळे या मार्गावरील लोकलसेवा ठप्प पडली होती. रेल्वे प्रशासनाने काही लोकल चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र या लोकल तब्बल ३० ते ४० मिनिट विलंबाने धावत होत्या. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.
भरतीमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब
अरबी समुद्राला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी मोठी भरती असल्यामुळे समुद्रामध्ये ४.२६ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. यावेळी शहरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे ठीक ठिकाणी एक ते दोन फूट पाणी तुंबले होते.
घर पडून दोन जखमी
शहर व उपनगरात बारा पेक्षा जास्त ठिकाणी घरे व घराच्या भिंती पडल्या. गोवंडी बैंगनवाडी जी लाईन रॉड, येथे तळमजला अधिक एक मजला असलेले घर पडले. या घटनेत १ पुरुष व १ महिला जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सर्वाधिक पाऊस (शहर)
वरळी -१७२ मिमी
माटुंगा -१५० मिमी
परळ -१६७ मिमी
मलबार हिल -१७४ मिमी
लोअर परेल -१७० मिमी
पूर्व उपनगरे
विक्रोळी पश्चिम- २६३ मिमी
टागोर नगर, विक्रोळी -२५० मिमी
पवई -२४९ मिमी
भांडुप -२४३ मिमी
घाटकोपर -२०० मिमी
पश्चिम उपनगरे
मालाड -२३४ मिमी
अंधेरी -२०८ मिमि
जोगेश्वरी- २१९ मिमी
चकाला -२०० मिमी
अंधेरी -२१७ मिमी
शनिवारची तुंबई : पूर्व उपनगरे - साकीनाका, काजूपाडा काळे मार्ग कुर्ला, अशोक नगर कुर्ला, छेडानगर जंक्शन चेंबूर, पवई, भांडुप, पश्चिम उपनगर - अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, गोरेगांव पूर्व, दहिसर