Mumbai Rain file photo
मुंबई

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा धुमाकूळ; लोकल व रस्ते वाहतूक विस्कळीत

मुंबईत रातभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.

मोहन कारंडे

Mumbai Rain

मुंबई : काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची अक्षरश: तारांबळ उडाली आहे. पुढील काही तास अजुन मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वसई-विरारसह मीरा भाईंदरमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाचा फटका रेल्वेलाही बसला असून रेल्वे वाहतूक उशिरा सुरू आहे. (Mumbai Rain)

रेल्वे वाहतूक २० मिनिटे उशिरा

मध्य रेल्वेच्या मेन लाइन वरील वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील २० मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमानी तसेच सलग सुट्ट्यांमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांची पावसाने तारांबळ उडाली आहे.

सायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी

नवी मुंबई शहरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दिवसभर असाच पाऊस सुरू राहिला तर नवी मुंबईच्या अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.

तुर्भे पोलीस ठाण्यात शिरले पाणी

मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यालादेखील बसला आहे. ठाण्याच्या आवारात व कार्यालयीन भागात पाणी शिरल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले, तर वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील काही तासांत परिस्थिती नियंत्रणात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विक्रोळी परिसरात दरड कोसळली

विक्रोळी येथील पार्क साईट परिसरातील जनकल्याण सोसायटी येथे रात्री १ च्या सुमारास दरड कोसळली. यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोन जखमींना राजावाडी रूग्णालयात दाखल केले आहे. घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरात अनेक डोंगराळ भाग आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात इथे दरड कोसळत असतात. पालिका अनेकदा उपायोजना करते, पण दरड कोसळल्यामुळे अनेकांचा मृत्यू देखील या परिसरामध्ये होत असतो. स्थानिक नागरिकांनी संरक्षक भिंत बनवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

शनिवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत पडलेला पाऊस

शहर -

  • प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा, शीव - १३४

  • वरळी सीफेस महानगरपालिका शाळा १२४

  • दादर वर्कशॉप - १२३

  • रावळी कॅम्प - १२३

  • आदर्श नगर शाळा, वरळी - १२२

पश्चिम उपनगरे -

  • मरोळ अग्निशमन केंद्र - २०७

  • नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ - २०२

  • चकाला महानगरपालिका शाळा, अंधेरी - १९५

  • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी - १८३

  • अंधेरी अग्निशमन केंद्र- १७७

पूर्व उपनगरे -

  • टागोर नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी - १९६

  • इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी पश्चिम - १९५

  • एन विभाग कार्यालय - १९२

  • रमाबाई महानगरपालिका शाळा, घाटकोपर - १८९

  • एमसीएमसीआर, पवई - १८७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT