Mumbai Rain update |
मुंबई : मुंबईत सोमवारी झालेल्या धुवाँधार पावसानंतर आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसामुळे मुंबईतील हवामान आल्हाददायक झाले आहे. आजही शहरात ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार, १९१८ चा सर्वाधिक पावसाचा विक्रम मान्सूनने आपल्या आगमनालाच मोडला. कुलाबा वेधशाळेनुसार, मे महिन्यात शहरात २९५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मे १९१८ मध्ये पडलेल्या २७९.४ मि.मी. पावसाचा विक्रम मोडीत निघाला. सांताक्रूझ वेधशाळेच्या नोंदीनुसार, मुंबईत २७ जुलै २००५ रोजी ९४४ मि.मी. इतका प्रलयंकारी पााऊस एका दिवसात कोसळला होता. कुलाबा वेधशाळेच्या नोंदीनुसार, ५ जुलै १९७४ रोजी ५७५ मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस पडला होता. सांताक्रूझ वेधशाळेने उपनगरात नोंदवलेल्या नोंदीनुसार, यंदाच्या मे महिन्यात १९७.८ मि.मी. पाऊस पडला आहे. यापूर्वी अशी सर्वाधिक पावसाची नोंद २००० मध्ये ३८७.८ मि.मी. होती.
सोमवारी रात्रभर धोधो कोसळलेल्या पावसाने मुंबई ठिकठिकाणी तुंबली, पश्चिम व मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प पडली, हार्बरही रखडली आणि वाहतूक कोंडीत मुंबईकर अडकून पडले. भुयारी मेट्रोमध्येही पाणी शिरले. जलरोधक भिंतच कोसळल्याने आचार्य अत्रे भुयारी स्थानकात दलदल निर्माण झाली. वरळी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो तूर्त स्थगित करण्यात आली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत कधी नव्हे तो विक्रमी पाऊस पडला. नरिमन पॉईंट परिसरात सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल २५२ मिमी, तर फोर्ट परिसरात २१६ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भाग व्यापून टाकला आहे. मे महिन्यातच रत्नागिरीतील पानवल धबधबा प्रवाहीत झाला आहे. खेड, संगमेश्वर, लांजा, चिपळूणमधील सर्व छोटे मोठे धबधबे प्रवाहीत झाले आहेत. मान्सूनमुळे कोकणातील निसर्गसौंदर्य बहरून गेलं आहे. निसर्गाकडे कपारीतून वाहणारा रत्नागिरीतील पानवल धबधबा प्रवाहीत झाला आहे.
पुणे, सोलापूर आणि नगरकरांसाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरणात पाणीसाठा वाढला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटामध्यावर आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडा भरापासून पाऊस कोसळत आहे. सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात २६ हजार १०६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरवात केली आहे. मंगळवारी सकाळी देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडली, त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.
कोल्हापुरात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. आज मात्र कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासूनच काही भागात जोरदार तर शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा १९.८ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातले एकूण १३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण सुद्धा जवळपास ४८ टक्के भरले आहे.