मुंबई : मुंबईतील तापमानामध्ये झालेली वाढ यामुळे उन्हामध्ये जनगणना व मतदार यादी शुद्धीकरण करणे कर्मचाऱ्यांना विशेषत: महिला शिक्षकांना आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एका पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे मतदार यादी शुद्धीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबईमध्ये 2002 ज्या मतदार यादीनुसार मतदारांच्या नावाची तपासणी करून दुबार नावे वगळणे व संपूर्ण मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची, शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम सुरू असताना जनगणनेचे कामही याच कर्मचारी व शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे.
भर उन्हात फिरून हे काम करावे लागत असल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. दहिसर येथे निवडणूक संदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ड्युटी करत असताना एका महिला शिक्षिकेच्या पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्या. या महिला शिक्षिकेला तातडीने त्या राहत असलेल्या कल्याण येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये उपचार घ्यावे लागले.
या घटनेची गंभीर दखल मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतली आहे उन्हामुळे निवडणूक व जनगणनेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेषत: महिला शिक्षकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, निवडणूक विषयक कामे पुढे ढकलण्यात यावीत, अशी विनंती भिडे यांनी निवडणूक विभागाला केली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग आता काय निर्णय घेणार यावर कर्मचाऱ्यांचे आरोग्य अवलंबून आहे.
जनगणनाही पुढे ढकलण्याची शक्यता
कडक उन्हामुळे मुंबईतील तापमानाचा पारा 39 सेल्सिअस पर्यंत पोहचला होता. सकाळी 10 नंतर रखरखत्या उन्हामध्ये फिरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. महिला शिक्षकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, जनगणनेचा कार्यक्रमही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापपर्यंत जनगणना पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.