Western Railway Mumbai rains
मुंबई : मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या उशिराने धावत आहेत.  Western Railway x account
मुंबई

Mumbai rains | मुंबईत मुसळधार! रेल्वे वाहतूक विस्क‍ळीत, एनडीआरएफची पथके तैनात

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत (Mumbai rains) आज मध्यरात्री १ ते सकाळी ७ वाजेदरम्यानच्या ६ तासांत सुमारे ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. आज दिवसभरातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मुंबई आणि उपनगरांत मध्यरात्री १ ते सकाळी ७ दरम्यान सर्वाधिक पाऊस पडलेली ठिकाणे

  • वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

  • एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

  • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

  • चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

  • आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

  • नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

  • जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

  • प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

  • नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

  • लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

  • शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

  • रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

  • धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

  • बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)

एनडीआरएफ पथके तैनात

दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ठाणे, वसई (पालघर), महाड (रायगड), चिपळूण (रत्नागिरी), कोल्हापूर, सांगली, सातारा घाटकोपर, कुर्ला आणि सिंधुदुर्ग येथे एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अंधेरी येथे नियमित ३ आणि नागपूर येथे १ पथक तैनात केले असल्याची माहिती एनडीआरएफने (NDRF) दिली आहे.

रेल्वे गाड्यांना विलंब

मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवरील पाणी काढण्यासाठी उच्च क्षमतेच्या जलपंपांचा वापर केला जात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी

"मुंबईत आजही मुसळधार पाऊस (Mumbai rains) पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील सर्व बीएमसी, सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राबाबत निर्णय कळवला जाईल." असे BMC ने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT