Mumbai Government Hospitals Pudhari
मुंबई

Mumbai Government Hospitals: मुंबईतील शासकीय रुग्णालयांत डासांची वाढ; डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला

सेंट जॉर्ज, कामा, जे.जे. आणि जीटी रुग्णालय परिसरात शेकडो प्रजनन स्थळे; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शहरातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये निष्काळजीपणामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. सेंट जॉर्जेस, कामा रुग्णालय, जे जे रुग्णालय आणि जीटी या रुग्णालयांच्या परिसरात डेंग्यू व मलेरिया डासांच्या अळ्या मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महापाविकेच्या कीटकनाशक विभागाच्या माहितीनुसार, 2022 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत या चार रुग्णालयांमध्ये एडिस (डेंग्यू) व ॲनोफिलीस (मलेरिया) डासांच्या प्रजनन स्थळांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेषतः जीटी रुग्णालयात 2022 मध्ये 56 प्रजनन स्थळे आढळली होती. 2025 मध्ये ही संख्या तब्बल 315 वर पोहोचली. त्यापैकी 197 मलेरिया व 119 डेंग्यू प्रजनन स्थळांचा समावेश होता. कामा रुग्णालयात चार वर्षांत प्रजनन स्थळांची संख्या नऊ पट वाढल्याचे नोंदवले गेले आहे. जे.जे. रुग्णालयात पाच पट, तर सेंट जॉर्ज रुग्णालयात जवळपास दीड पट वाढ झाली आहे. एडिस आणि ॲनोफिलीस हे डास अनुक्रमे डेंग्यू आणि मलेरियाचे वाहक असल्याने ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

बांधकामामुळे वाढला धोका?

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले की, रुग्णालय परिसरात स्टाफ व रेसिडेंट डॉक्टर क्वार्टर्स आहेत. अनेक इमारती जुन्या असून गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुरुस्ती व बांधकाम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून प्रजनन स्थळे निर्माण झाली असावीत. ‌‘सध्या स्वच्छता मोहीम राबवून संभाव्य ठिकाणांची साफसफाई केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जीटी रुग्णालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कामा रुग्णालयातील सूत्रांनीही सुरू असलेल्या बांधकामामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, गेल्या काही महिन्यांत कचरा हटविणे, तुंबलेले गटार साफ करणे व नियमित फवारणी यांसारख्या उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रुग्णालय परिसरातच डासांची वाढ होत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून, आरोग्य व्यवस्थेच्या स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT