Gold  Pudhari
मुंबई

Mumbai Gold Market: मुंबईत तीन महिन्यांत ग्राहकांनी काढले २५० टन सोने मोडीत; मुंबईसह उपनगरांत ३७५ कोटींची उलाढाल

सराफाला ‘सोने मोड’ची झळाळी

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्षभर सोने खरेदी करू नका, या आवाहनाला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सोने खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र ही घट नोंदवताना मुंबईकरांनी मागील तीन महिन्यांत आपल्याकडील जुने सोने मोडीत काढून त्याच सोन्याचे नवीन दागिने घडवले.

मुंबईकरांच्या या सुवर्ण रिसायकलिंगची उलाढाल इतकी वाढली की, तीन महिन्यांत एकट्या मुंबईत २५० टन सोने मोड देऊन ग्राहकांनी नवीन सोने खरेदी केले. रुपयांमध्ये ही उलाढाल तब्बल ३७५ कोटी रुपयांची असल्याची माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला दिली.

मुंबईत गेल्या सहा महिन्यांपासून सोने खरेदीत मंदी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते. त्‍यानंतर सोने १ लाख ८० हजार रुपये तोळ्यावरून १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत घसरले. तरीही सराफ बाजारात शुकशुकाट जाणवतो. चांदीच्या दरात मात्र कायम चढ-उतार होताना दिसतात.

पाच दिवस चालणारा इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (आयआयजेएस) भारत प्रीमियर २०२६ ५ ऑगस्टला सुरू झाला. ९ ऑगस्टपर्यंत तो जीओ सेंटरमध्ये, तर ६ ते १० ऑगस्टदरम्यान नेस्को या ठिकाणी आहे. या प्रदर्शनात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता होती. मात्र ती कुठलीही दरघसरण नसल्याचे कुमार जैन यांनी सांगितले.

मुंबईत १० ग्रॅमपासून १०० ग्रॅमपर्यंत मोड देऊन नवीन दागिने ऑर्डर देऊन बनविण्यात आले. यामध्ये अनेक ग्राहकांनी जुन्या पध्दतीचे दागिने म्हणजे लक्ष्मी हार, राणीहार, चपला ( पोहेहार), एकदानी, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, बुगडी, नथ, कुडी, बाजूबंद, पाटल्या अशा प्रकारचे दागिने मोडमध्ये देण्यात आले, तर काही डागी दागिने मोडून विनाडागी दागिने बनविण्यात आल्याची माहिती कुमार जैन यांनी दिली.

काल गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी सोने १ लाख ४३ हजार ५०० रुपये तोळे होते, तर आज शुक्रवारी ८ ऑगस्टला ६ हजार रुपयांनी वधारले असून १ लाख ४९ हजार ५०० रुपये तोळे दर होता. येत्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊन सोने प्रतितोळा १ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोण्याची शक्यता जैन यांनी व्यक्त केली.

सोन्याचे दर कमी होत नसल्याचे लक्षात येताच मुंबईकरांनी आज १ लाख ४९ हजार रुपये प्रतितोळे दर असताना तब्बल २५० कोटींचे सोने खरेदी करत पुन्हा एकदा मुंबईच्या सराफ बाजाराला झळाळी आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT